परधर्मीय तरुणासोबत फिरण्याच्या संशयावरून तरुणीचे अपहरण : एक आरोपीला पोलिसांनी घेतले ताब्यात
By राम शिनगारे | Published: April 28, 2023 10:24 PM2023-04-28T22:24:30+5:302023-04-28T22:24:38+5:30
जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.
छत्रपती संभाजीनगर : मोंढा नाका परिसरातील स्पा सेंटरच्या व्यवस्थापकासोबत दुचाकीवर असलेल्या तरुणीला रस्त्यात आडवून शिवीगाळ करीत तिचे रिक्षातुन अपहरण केल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. या प्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला असून, एका संशयीतास ताब्यात घेतल्याची माहिती पोलिस निरीक्षक अशोक भंडारे यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार माेंढानाका परिसरात भिमसिंग नायक यांच्या मालकीचे अथर्व पार्लर सेंटर आहे. त्याठिकाणी फिर्यादी स्वयमसिंग प्रविणकुमार सिंग हे व्यवस्थापक आहे. सेंटरमध्ये ब्युटीशियन, हेल्पर असा पाच ते सहा तरुणींचा स्टाफ आहे. या तरुणी सिंधी कॉलनीत राहतात. शुक्रवारी सकाळी १० वाजता दोन तरुणी पार्लर शॉपला आल्या. त्यातील एका तरुणीला सीमकार्ड घ्यायचे होते. त्यासाठी लागणारे आधारकार्ड तिच्या खोलीवरच विसरले. त्यामुळे स्वयमसिंग हे दुचाकीवर मुलीला घेऊन खोलीवर गेला.
त्याठिकाणी आधारकार्ड घेतल्यानंतर इतर चार तरुणी ॲटो रिक्षात आणि सोबतची तरुणी दुचाकीवर बसून शॉपवर येत असताना मोंढा नाका उड्डाणपुलाच्या खाली दोन जणांनी रस्त्यात त्यांना आडवले. त्या दोघांनी 'हमारे साथ चलो नही तो काट डालेंगे' असे म्हणून धमकावले. तोपर्यंत आणखी चारजण त्याठिकाणी आले. त्यांनी आमच्यासोबत चला म्हणून मारण्याची धमकी देऊ लागले. तेव्हा इतर तरुणींना घेऊन येणारी रिक्षाही थांबली. फिर्यादीने त्या रिक्षात दुचाकीवरील तरुणीला बसवून शॉपच्या दिशेने पाठविले. शॉपच्या समोर रिक्षा थांबताच सहा ते सात जण पाठलाग करीत तेथे पाेचहले. दुचाकीवरील तरुणीला जबरदस्तीने रिक्षात बसवून अपहण केले. फिर्यादीने घटनेची माहिती पोलिसांनी दिल्यानंतर निरीक्षक अशोक भंडारे, उपनिरीक्षक अनंता तांगडे यांच्यासह इतरांनी रिक्षाचालकाचा शोध घेऊन त्यास मुलीला ठाण्यात घेऊन येण्याच्या सूचना केल्या. अधिक तपास उपनिरीक्षक अश्फाक शेख करीत आहेत.
एक संशयीत घेतला ताब्यात
तरुणीचे अपहरण करणाऱ्या सहा ते सात जणांपैकी अरबाज जाकीर कुरेशी (२२, रा. सिल्लेखाना) यास जिन्सी पोलिसांनी ताब्यात घेतले. या आरोपींनी तरुणीला परधर्मीय तरुणासोबत पाहिल्यामुळे बुढीलाईन व भडकल गेट येथे घेऊन गेले. पोलिसांचा फोन येत असल्यामुळे आरोपी सिटीचौक भागातच उतरल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. बेगमपुरा भागातही दोन दिवसांपूर्वी अशीच घटना उघडकीस आली होती. त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.