कोट्यवधीच्या एलपीजी पंपांच्या मालकीत भागीदाराचे नाव काढून आईला घुसवले, पुंडलिकनगर ठाण्यात गुन्हा दाखल
By राम शिनगारे | Published: December 17, 2022 08:22 PM2022-12-17T20:22:37+5:302022-12-17T20:23:08+5:30
भागीदारीमध्ये सुरू केलेल्या दोन एलपीजी पंपांच्या व्यवसायात एकाची भागीदारीच बनावट कागदपत्रे, सह्याच्या आधारे उडवून लावत, तेथे स्वत:च्या आईचे नाव लावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
औरंगाबाद : भागीदारीमध्ये सुरू केलेल्या दोन एलपीजी पंपांच्या व्यवसायात एकाची भागीदारीच बनावट कागदपत्रे, सह्याच्या आधारे उडवून लावत, तेथे स्वत:च्या आईचे नाव लावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात पती-पत्नी, सासू, कंपनी सचिव व एस्से पेट्रोलियम कंपनी संचालकांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदविल्याची माहिती निरीक्षक विठ्ठल पोटे यांनी दिली.
आरोपींमध्ये मालक सोनाली श्रीकांत जाधव, तिचा पती श्रीकांत शिवाजीराव जाधव (रा. एन १, सिडको), आई आशा राजन देशमुख (रा. काटोल, जि. नागपूर), कंपनी सचिव प्रसाद सतीश टाकळकर (रा. उस्मानपुरा) आणि एस्से पेट्रोलियम कंपनीचे संचालक अय्युब पुवाथल्ली (रा. कालिकत, केरळ) यांचा समावेश आहे. शीतल पांडेय (रा. एन ३, सिडको) यांच्या फिर्यादीनुसार, आरोपी सोनाली जाधव हिच्यासोबत १ एप्रिल २०१८ मध्ये ५०-५० टक्के भागीदारीत अलायन्स एलपीजी एलएलपी नावाने करारनामा करीत विद्यानगर, गजानन महाराज मंदिर रोड व पद्मपुरा भागात असे दोन एलपीजी पंप सुरू केले. या दोन्ही पंपांचा दैनंदिन कारभार सोनालीचे पती श्रीकांत जाधव व फिर्यादीचे पती आदित्य पांडेय पाहत होते. २० लाखांपासून सुरू केलेला व्यवसाय तीन वर्षांत कोट्यवधी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. नमूद आरोपींनी पैशांच्या लालसेपोटी संपूर्ण व्यवसायच हडप करण्याचा प्रयत्न केला.
सोनाली हिने बनावट कागदपत्रे व सह्यांच्या आधारे स्वत:ची आई आशा देशमुख यांचे नाव फिर्यादीच्या जागेवर भागीदारीत घुसविले. त्यानंतर १९ जुलै रोजी सोनाली हिने फिर्यादीला दोघींमधील भागीदारीचा व्यापार रद्दबादल केल्याची नोटीस पाठवली. २५ जुलै रोजी पत्र मिळाल्यानंतर फिर्यादीस धक्काच बसला. त्यांनी २८ जुलै रोजी कायदेशीर उत्तर पाठवले. त्यानंतर २५ नोव्हेंबर रोजी फिर्यादीचे पती नेहमीप्रमाणे दैनंदिन रोख रक्कम गोळा करण्यासाठी विद्यानगर येथील गॅस पंपावर गेले. तेथे श्रीकांत जाधव याने अडवून, पुन्हा पंपावर यायचे नाही, अशी धमकीच दिली. त्यानंतर शासनाच्या संकेतस्थळावर खात्री केल्यानंतर भागीदारीतून काढल्याचेही फिर्यादीला दिसून आले. गुन्हा नोंदविल्यानंतर याप्रकरणी अधिक तपास निरीक्षक विठ्ठल पोटे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक संदीप काळे करीत आहेत.
पंपांवर गुंडांचा खडा पहारा
आरोपी श्रीकांत जाधव याने दोन्ही पंपांवर गुंडांचा खडा पहाराच बसवला आहे. त्याठिकाणी दररोज जमा होणारे पैसे या गुंडांच्या बळावर हडप करण्यात येत आहेत. हा प्रकार फिर्यादीसह त्यांच्या पतीने थांबविण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.
बँकेत नवे खातेही उघडले
दोघींचा करारनामा झाल्यानंतर काढलेल्या बँक खात्याशिवाय आरोपींनी कॉसमॉस व ॲक्सिस बँकेत नवीन खाते उघडून त्याद्वारे व्यवहार सुरू केले. त्यासाठी बनावट कागदपत्रेही सादर केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.