बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 18:09 IST2025-04-22T17:59:40+5:302025-04-22T18:09:57+5:30
बँकेत जाळपोळ करणाऱ्या ५ आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून एक फरार आहे

बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
वैजापूर ( छत्रपती संभाजीनगर): येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत 20 एप्रिल रोजी पहाटे 3.24 वाजता चौघांनी कुलूप तोडून बँकेत प्रवेश केला. त्यांनी लावलेल्या आगीत संपूर्ण बँक जळून सुमारे 15 लाख रुपयांचे नुकसान झाले होते. यावेळी बँकेच्या गेट बाहेर एक कार (MH-14 BX-7988) आढळून आली होती. गुन्हे शाखेने हाच धागा पकडून तपास करत या संपूर्ण घटनेचा उलगडा केला. या मागे धक्कादायक कारण असल्याचे पुढे आले आहे.
फिर्यादी बजरंगलाल ठाका (बँक मॅनेजर) यांच्या तक्रारीवरून वैजापूर पोलिसांनी गु.र.क्र. 193/2025, भा.दं.वि. कलम 305, 331(4), 62, 326(जी), 324(5) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड आणि अपर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सतिष वाघ व सपोनि पवन इंगळे यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू करण्यात आला. बँकेच्या बाहेर आढळून आलेल्या गाडीच्या तपासणीत डिक्कीमध्ये वेगवेगळ्या बनावट नंबर प्लेट आढळल्या. यावरून गाडी मालेगाव येथील ओम साई ऑटो कन्सल्टिंगमधून खरेदी झाली असून विक्रीदरम्यान खरेदीदाराची चुकीची माहिती नोंदवली गेल्याचे निष्पन्न झाले.
बँकेने गुन्हा दाखल केल्याने घेतला बदला
तांत्रिक तपासानंतर 21 एप्रिल रोजी अक्षय ज्ञानेश्वर कराळे (रा. करंजगाव) याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. भरत शिवाजी कदम या व्यक्तीने बँकेवर रागापोटी हा कट रचल्याचे त्याने उघड केले. भरत शिवाजी कदम ( रा. विरगाव) याने महाराष्ट्र ग्रामीण बँकेने बनावट कागदपत्रा आधारे कर्ज घेतल्याप्रकरणी वैजापुर ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्याचा राग व बदला घेण्यासाठीच भरत कदम याने हा सर्व प्लॅन आखल्याचे कराळे याने सांगितले.
पाच आरोपी अटकेत, एक फरार
या प्रकरणात अक्षय ज्ञानेश्वर कराळे (28, करंजगाव) , भरत शिवाजी कदम ( विरगाव), सचिन सुभाष केरे (25, गवळी शिवरा ), वैभव उर्फ गजु पंढरीनाथ केरे (27, गवळी शिवरा), धारबा बळीराम बिराडे (31, अंधोरी), आणि आप्पा बालाजी बने (अंधोरी) अशी आरोपींची नावे आहेत. यातील आप्पा बने हा अद्याप फरार असून तो बँकेच्या आगीत भाजल्याची माहिती आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार मे. राठोड, अपर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतिष वाघ, सपोनि पवन इंगळे, पोह भागीनाथ आहेर, पोह विठ्ठल डोके, पोह वाल्मीक निकम, पोह शिवानंद बनगे, पोना अशोक वाघ, पोना दिपक सुरोशे, पोअं. राहुल गायकवाड, पोअं. योगेश तरमाळे, यांनी केली.