Video: भटके कुत्रे मागे लागल्याने मांजरीचा ६० फुट उंच झाडावर आसरा; असे वाचले प्राण
By साहेबराव हिवराळे | Published: December 7, 2023 07:33 PM2023-12-07T19:33:47+5:302023-12-07T19:39:59+5:30
अग्निशमन विभागाने ६० फुटांवर अडकलेल्या मांजरीचा वाचविला जीव
छत्रपती संभाजीनगर : मोकाट कुत्रे मागे लागल्याने जीव वाचविण्यासाठी एका मांजरीने हडकोतील फरशी मैदानावरील उंच झाडावर आसरा घेतला; परंतु तिला दोन दिवसांपासून झाडावरून परत खाली उतरता येईना. अखेर अग्निशमन विभागाने तिला सुखरूप खाली उतरवले.
फरशी मैदान, एन-९ येथे बळीराम पाटील शाळेच्या मागे उद्यानाजवळ दोन दिवसांपासून उंच झाडावर एक मांजर अडकली. ती कुत्र्यांपासून वाचण्यासाठी वर चढली होती, हे आम्ही बघितले होते, असे स्थानिक युवकांनी सांगितले. मंगळवारी सकाळी बागेत निसर्गप्रेमी गेले असता मांजरीच्या केविलवाण्या ओरडण्याचा आवाज खूप जास्त येत होता. उपाशी असल्यामुळे व खाली येता येत नसल्यामुळे ती जोरजोरात ओरडत होती. युवकांनी अग्निशमन विभागाशी संपर्क साधला.
अग्निशमन विभागाने ६० फुटांवर अडकलेल्या मांजरीचा वाचविला जीव #cat#chhatrapatisambhajinagarpic.twitter.com/Id7xYVUbVb
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) December 7, 2023
अग्निशमन विभागाचे विजय राठोड व त्यांच्या रेस्क्यू टीमचे आकाश नरेकर हे ६० फूट उंच झाडावर चढले. तेथे विजेच्या तारा असल्यामुळे परिसरातील वीजपुरवठा आधी बंद करावा लागला. जेसीबीने मांजरीला सुखरूप वरून खाली घेण्यात आले. दोन दिवसांपासून उपाशी असलेल्या मांजरीला आधी दूध पाजण्यात आले. नागरिक सुशील पवार व लाइफ केअर संस्थेचे सचिव जयेश शिंदे यांनी अग्निशमन विभागाचे आभार मानले.