मराठवाड्यात टँकरचे शतक; हिवाळ्यातच पाणीटंचाईची चाहूल
By विकास राऊत | Published: November 10, 2023 05:32 PM2023-11-10T17:32:08+5:302023-11-10T17:32:20+5:30
सध्या १२० हून अधिक टँकरद्वारे पाणीटंचाई असलेल्या गावे, वाड्यांना पाणीपुरवठा केला जात आहे.
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात सध्या १२० टँकरने पाणीपुरवठा करावा लागत असून आगामी काळात ही संख्या वाढण्याची चिन्हे आहेत. हिवाळ्यातच पाणीटंचाईची चाहूल लागली असून गुरुवारी विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांनी विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेतली. मराठा आरक्षण पुरावे शोध मोहीम, पीकविमा, पाणीटंचाई, महसुली वसुलीच्या अनुषंगाने बैठकीत चर्चा झाली.
आयुक्त आर्दड म्हणाले, मराठा आरक्षण पुरावे शोध मोहिमेसह विभागातील पाणी व चाराटंचाईचा आढावा घेतला. सध्या १२० हून अधिक टँकरद्वारे पाणीटंचाई असलेल्या गावे, वाड्यांना पाणीपुरवठा केला जात आहे. पाण्याची कमतरता लक्षात घेता भविष्यात टँकरची संख्या वाढण्याची शक्यता आहे. जनावरांना मुबलक चारा उपलब्ध असावा, टंचाई भासू नये, यासाठी चारा लागवड करा, गाळपेरा यावर प्राधान्य द्या. महाबीजकडून चारा बियाणे घ्यावे. यासाठी डीपीसीतून निधी उपलब्ध करून द्यावा, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केल्या. तसेच, विभागातील पोलिस ठाणे, परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे सुरू आहेत की नाही यावर बैठकीत चर्चा झाली. कॅमेरे नादुरुस्त असतील तर ते सुरू करण्याबाबत बैठकीत आदेश देण्यात आले. बैठकीस जिल्हाधिकारी अस्तिककुमार पांडेय यांच्यासह विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांसह इतर अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
विमा कंपन्याचे आक्षेप फेटाळले
छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, हिंगोलीसह लातूर या चार जिल्ह्यांतील संबंधित पीक विमा कंपनीने सादर केलेले आक्षेप फेटाळण्यात आले आहेत. पीक विमा योजनेतील तरतुदीनुसार २५ टक्के अग्रिम नुकसान भरपाई शेतकऱ्यांना तातडीने देण्याचे आदेश कंपन्यांना दिले आहेत. विभागात यंदाच्या पावसाळ्यात १५ टक्के तूट राहिली आहे. विभागातील सूमारे २४५ हून अधिक मंडळांत सलग २१ किंवा त्यापेक्षा अधिक दिवसांचा खंड पडल्याने पिकांच्या उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे विमा योजनेतील मध्य हंगाम प्रतिकूलता या बाबीखाली संबंधित शेतकऱ्यांना विमा संरक्षित रकमेच्या २५ टक्के अग्रिम नुकसान भरपाई देण्याबाबत आदेश दिले आहेत.
-मधुकरराजे आर्दड, विभागीय आयुक्त