चिनी ड्रॅगनने सिंहासोबत महिषासूर मर्दिनीजवळ पटकावली जागा, भक्तांमध्ये ठरतोय चर्चेचा विषय
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2024 08:04 PM2024-10-01T20:04:44+5:302024-10-01T20:05:36+5:30
विशेष म्हणजे या मूर्ती चीनमधील मूर्तिकारांनी नव्हे, तर स्थानिक मूर्तिकाराने तयार केली आहे.
छत्रपती संभाजीनगर : दुर्गा देवीलाच महिषासूर मर्दिनी म्हटले जाते. महिषासूर नावाच्या राक्षसाला मारण्यासाठी देवीने रौद्ररूप धारण केले होते. सिंहारूढ देवीने राक्षसाला आपल्या पायदळीत तुडवत त्याच्या छातीवर त्रिशूलाने घाव केला. अशा रूपातील महिषासूर मर्दिनीच्या मूर्तीची नवरात्रोत्सवात पूजा केली जाते. मात्र, यंदा देवीच्या मूर्तीत चिनी ड्रॅगनने शिरकावा केला आहे. सिंहासोबतच ड्रॅगनवरही देवी बसली आहे. अशी मूर्ती भक्तांमध्ये चर्चेचा विषय बनली आहे.
चिनी ड्रॅगन शुभ की अशुभ
चार पाय असलेला सापांसारखा अक्राळविक्राळ दिसणारा तोंडातून आग ओकणाऱ्या चिनी ड्रॅगनचे भयानक चित्र आपल्याला माहिती आहे. आपल्याकडे त्याची छबी दुष्ट व घातक प्राण्यासारखी आहे. मात्र, चीन देशात या प्राण्याला पारंपारिक, शक्तिशाली आणि शुभ शक्तीचे प्रतिक मानले जाते. मात्र, देवीचे वाहन सिंह असतानाही मूर्तिकाराने ड्रॅगनचा वापर केला आहे. विशेष म्हणजे या मूर्ती चीनमधील मूर्तिकारांनी नव्हे, तर स्थानिक मूर्तिकाराने तयार केली आहे. हीच प्रथा पडेल आणि नवीन पिढीला हा चिनी ड्रॅगनच देवीचे वाहन आहे, हेच खरे वाटायला लागेल, अशी भीती भाविक व्यक्त करत आहेत.
मध्य प्रदेशातील धर्तीवर देवीच्या मूर्ती
यंदा मूर्तिकारांनी मध्य प्रदेशातील धर्तीवर देवीच्या मूर्ती बनविल्या आहेत. देवीच्या चेहऱ्याची मांडणी थोडी वेगळी आहे. ओरिजनल ब्लाऊज व साडी नेसवलेली आहे. काथ्यापासून तयार केलेली सिंहाच्या आयाळ या रूपातील मूर्ती नाविण्यपूर्ण ठरत आहे.
संगमरवरी दिसणारी वाॅटरप्रुफ मूर्ती
दुर्गा देवीची संगमरवरी मूर्ती बाजारात दाखल झाली आहे. लांबून बघितल्यावर ही देवी संगमरवरी वाटते, पण प्रत्यक्षात प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती आहे. त्यावर रंग असा दिला की, ती संगमरवरी वाटते. विशेष म्हणजे तो रंग वाटरप्रुफ आहे.
सिंहासनावर विराजमान देवीची मूर्ती यंदाचे आकर्षण
यंदा सिंहासनारूढ दुर्गा देवीची मूर्ती भाविकांचे आकर्षण ठरत आहे. त्यातही दोन-तीन नवीन डिझाइन बघण्यास मिळत आहेत, तसेच गणपती बाप्पा जसे सिंहासनावर गोलाकार उशी पाठीमागे घेऊन बसतो. त्या प्रमाणे बसलेली देवीची मूर्ती लक्षवेधी ठरत आहे.
साडेतीन शक्तिपीठाच्या मूर्ती
महाराष्ट्रात आदिमाया शक्तीचे साडेतीन शक्तिपीठे आहेत. कोल्हापूरची महालक्ष्मी माता, तुळजापूरची भवानी माता, माहूरगडावरील रेणुका माता व वणी (नाशिक) येथील सप्तश्रृंगी मातेच्या मूर्तीही विक्रीला आल्या आहेत.
१ ते ८ फुटांपर्यंतच्या मूर्ती
बाजारात १ फूट ते ८ फुटांपर्यंतच्या मूर्ती दाखल झाल्या आहेत. यात २२०० ते ३४ हजारांच्या मूर्तीचा समावेश आहे. लहान-मोठ्या ३५०० मूर्ती शहरात विक्री होतील. अमावस्येआधीच मूर्ती बुकिंगला सुरुवात झाली आहे.
- बी.एस. जवळेकर, मूर्तिकार.