आता हद्द झाली! पैठण हायवेवरील बंद पडलेल्या कंपनीत भरदिवसा चोरी, सुरक्षारक्षकास धमकावले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2024 01:54 PM2024-07-03T13:54:10+5:302024-07-03T13:55:00+5:30
''तू कुठे राहतो हे माहिती आहे, घरात घुसून मारू'', चाकूचा धाक दाखवत चोरट्यांनी चौकीदारास दिली धमकी
छत्रपती संभाजीनगर: पैठण महामार्गावरील चितेगाव येथील एका बंद पडलेल्या कंपनीत भरदिवसा चोरीची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. चार ते सहा चोरट्यांनी अवैधरीत्या आज सकाळी ९. ३० वाजता प्रवेश करत लोखंडी जाळी, दरवाजे, खिडक्या आणि इतर मौल्यवान सामानावर लंपास केले. चोरी रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या चौकीदारास चोरट्यांनी चाकू दाखवत धमकावले. ''तू कुठे राहतो हे माहिती आहे, घरात घुसून मारू'', अशी धमकी चौकीदारास देत चोरट्यांनी बिनधास्तपणे सामान लंपास केले. या भागात सातत्याने चोरीचे सत्र सुरू असल्याने कंपनी चालकात दहशतीचे वातावरण आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की. शंकर झुनझुनवाला यांची ओरियन लॅमिनेटस लिमिटेड ही कंपनी पैठण हायवेवर चितेगाव येथे आहे. काही वर्षांपासून कंपनी बंद असल्याने झुनझुनवाला यांनी येथे एक सुरक्षारक्षक नियुक्त केला आहे. कंपनी बंद असली तरी त्यात किंमती सामान आहे. त्यामुळे अनेकदा रात्रीच्या अंधारात कंपनीच्या आवारात घुसून चोरट्यांनी चोरी केली आहे. मात्र, आज सकाळी ९. ३० वाजता चोरट्यांनी हद्द केली, चार ते सहा चोरट्यांनी कंपनीत प्रवेश केला. जाळी, दरवाजे, खिडक्या आणि इतर मौल्यवान सामान चोरटे लंपास करू लागले. यावेळी सुरक्षारक्षकाने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. तेव्हा चोरट्यांनी चाकू दाखवत, ''तू कुठे राहतो हे माहिती आहे, घरात घुसून मारू'', अशी धमकी दिली. हा सर्व प्रकार सुरक्षारक्षकाने मोबाइलमध्ये शूट केला आहे. त्यानंतर सुरक्षारक्षकाने बीडकिन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांत तक्रार दाखल
कंपनीत यापूर्वी रात्रीच्या वेळी अनेकदा चोरी झालेली आहे. मात्र, यावेळी चोरट्यांनी धाडस दाखवत सकाळीच कंपनीत प्रवेश केला. सुरक्षारक्षकास धमकावत चोरट्यांनी लोखंडी जाळी, दरवाजे, खिडक्यासह इतर मौल्यवान सामान लंपास केले. ११२ क्रमांकावर संपर्क केला मात्र, पोलिसांनी स्टेशनमध्ये येऊन तक्रार दाखल करण्याचे सांगितले. त्यानुसार सुरक्षारक्षकाने बीडकिन पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. तसेच याबाबत सीएमआय यांना निवेदन देत लक्ष देण्याची मागणी केली आहे.
- शंकर झुनझुनवाला, एमडी, ओरियन लॅमिनेटस लिमिटेड