दिवाळी साजरी करून दुचाकीवरून येणाऱ्या दाम्पत्यास कंटेनरने चिरडले
By राम शिनगारे | Updated: November 19, 2023 21:01 IST2023-11-19T21:01:20+5:302023-11-19T21:01:29+5:30
पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी : झाल्टा परिसरातील घटना, चिकलठाणा पोलिस ठाण्यात नोंद

दिवाळी साजरी करून दुचाकीवरून येणाऱ्या दाम्पत्यास कंटेनरने चिरडले
छत्रपती संभाजीनगर : गावाकडे दिवाळी साजरी करून शहरात परतणाऱ्या दाम्पत्यास कंटेनरने पाठीमागून जोराची धडक देत चिरडले. त्यात पतीचा जागीच मृत्यू झाला, तर पत्नी गंभीर जखमी झाल्या आहेत. ही घटना रविवारी सकाळी ८:०० वाजेच्या सुमारास झाल्टा फाटा परिसरातील पेट्रोल पंपासमोर घडली. याप्रकरणी चिकलठाणा पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.
अपघातात पंडित बाबू चव्हाण (४२, रा. रेणुकानगर, गारखेडा परिसर) यांचा मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी वैशाली पंडित चव्हाण (३८) या गंभीर जखमी झाल्याची माहिती चिकलठाणा पोलिसांनी दिली. जखमीवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत पंडित चव्हाण हे एका खासगी कंपनीत नोकरी करतात. त्यांना दोन मुले असून, खासगी शिकवणीमुळे मुले शहरातच थांबली होती. मात्र, चव्हाण पती - पत्नी दिवाळीच्या सणानिमित्त जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील जोगेश्वरी या मूळ गावी दुचाकीवरून गेले होते.
रविवारी पहाटेच गावाहून शहरात दुचाकीवरून (एमएच २० एफजे २६८८) परत येत होते. तेव्हा झाल्टा फाटा परिसरातील इंडियन ऑईल पेट्रोल पंपासमोर जात असतानाच पाठीमागून सुसाट वेगात आलेल्या कंटनेरने (एमएच १७ बीवाय ६९७४) दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत पंडित चव्हाण हे कंटेनरच्या चाकीखाली सापडले. त्यात त्यांचा चेंदामेंदा झाला, तर वैशाली या बाजुला फेकल्या गेल्या. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या चव्हाण दाम्पत्याला पेपर विक्रेते गणेश खटके, सुभाष पवार, दिनेश शेकडे यांच्यासह इतरांनी घाटी रुग्णालयात तत्काळ दाखल केले. त्याठिकाणी पंडित यांना तपासून मृत घोषित केले, तर वैशाली यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेची नोंद चिकलठाणा पोलिस ठाण्यात करण्यात आली. अधिक तपास पोलिस निरीक्षक रवींद्र खाडेकर यांच्या मार्गदर्शनात जमादार व्ही. एन. बोचरे करीत आहेत.