कपाशीच्या ८६४ रुपयांच्या बियाणांसाठी १२००रुपयांची मागणी; डमी ग्राहक पाठवून कृषी विभागाची कारवाई
By बापू सोळुंके | Published: June 8, 2024 08:40 PM2024-06-08T20:40:36+5:302024-06-08T20:41:02+5:30
सात दुकाने बंद करण्याचे आदेश, शेतकऱ्यांकडून फोन पे द्वारे १२००रुपये घेताच भरारी पथकाने दुकानदारावर कारवाई केली.
छत्रपती संभाजीनगर : शेतकऱ्यांना लुटण्याची एकही संधी व्यापारी सोडत नसल्याचा अनुभव कृषी विभागाने शनिवारी जिल्ह्यात विविध कृषी सेवा केंद्रावर पाठविलेल्या डमी ग्राहकांना आणि अधिकाऱ्यांना आला. खरीप हंगामासाठी कपाशीच्या बियाणांची कृत्रिम टंचाई निर्माण करून ८६४ रुपये किंमतीच्या कपाशी बियाणासाठी शेतकऱ्यांकडून १२००रुपये उकळले जात असल्याचे दिसून आले. शेतकऱ्यांना लुटणाऱ्या पाच दुकानदारांवर कृषी विभागाने कारवाई सुरू केली असून या दुकानांचे परवाने निलंबित करण्यात येणार आहे.
माजी कृषी मंत्र्यांच्या मतदारसंघ असलेल्या सिल्लोड तालुक्यात कपाशी बियाणांची कृत्रिम टंचाई निर्माण करून काही दुकानदार जादा दराने कपाशी बियाणांची विक्री करीत असल्याची गुप्त माहिती कृषी विभागाच्या राज्य भरारी पथकाला मिळाली. अशा दुकानदारांविरोधात धडक कारवाई करण्यासाठी भरारी पथकाने शनिवारी सिल्लोड येथील कांचन ॲग्रो एजन्सी मध्ये डमी ग्राहक पाठवून कपाशीच्या बियाणाची मागणी केली. तेव्हा कपाशीच्या ४७५ ग्रॅम च्या एका पाकिटाची किंमत ८६४रुपये असताना बाराशे रुपयांत हे पाकिट विक्री केले. विशेष म्हणजे शेतकऱ्यांकडून फोन पे द्वारे १२००रुपये घेताच भरारी पथकाने दुकानदारावर कारवाई केली.
अशाच प्रकारे सिल्लोड तालुक्यातील शिवना येथील माऊली कृषी सेवा केंद्रात राशी कंपनीच्या कपाशीच्या बियाणासाठी कृषी विभागाने पाठविलेल्या शेतकऱ्याकडून अकराशे रुपये घेतले. ही रक्कमही संबंधित दुकानदाराने फोन पे च्या माध्यमातून स्विकारली. याच गावातील बळीराजा ॲग्रो एजन्सी चालकाने अन्य एका कंपनीच्या कपाशीच्या वाणाच्या ८६४ रुपये किमतीच्या बियाणासाठी शेतकऱ्याकडून हजार रुपये उकळले. याच गावातील श्रद्धा कृषी सेवा केंद्रचालकाने तुलशी कंपनीच्या बियाणासाठी शेतकऱ्याकडून बाराशे रुपये घेतल्याचे कृषी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. येथील साईनाथ कृषि सेवा केंद्र या विक्रेत्याने कबड्डी वाणाचा स्टॉक नसल्याचे सांगून शेतकऱ्यांना बियाणे विक्री केले नाही. यानंतर लगेच भरारी पथकाने संबंधित दुकानाची आणि त्याच्या गोडावूनच झडती घेतली असता तेथे बियाणांची पाकिटे आढळून आली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख व कृषी विकास अधिकारी प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आर. ए. पाटील आणि कृषी अधिकारी संजय व्यास यांनी केली.
पैठण ,कन्नड तालुक्यातही कारवाई
कृषी विभागाने पैठण तालुक्यातील बोरगाव अर्ज येथील पंचावतार कृषी सेवा केंद्रात डमी ग्राहक पाठवून कब्बडी वाणाची मागणी करण्यास सांगितले. तेव्हा दुकानदाराने १२००रुपयांत एक पाकिट विक्री केले. कन्नड तालुक्यातील पिशोर येथील भाग्यलक्ष्मी कृषी सेवा केंद्राचालकाने कबड्डी हे बियाणांचा स्टॉक असताना दुकानात बियाणे उपलब्ध नसल्याचे शेतकऱ्यांना सांगितले. याविषयी संबंधित शेतकऱ्यांनी लेखी तक्रार करताच भरारी पथकाने पुन्हा डमी ग्राहक पाठवून खात्री केली . यानंतर दुकान आणि गोडावूनवर छापा टाकला असता तेथे संबंधित बियाणांचे सात पाकिटे आढळून आली. उपविभागीय कृषी अधिकारी सुभाष आघाव, तालुका कृषी अधिकारी बाळराजे मुळीक आणि विकास पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कपाशी बियाणांच्या विशिष्ट वाणांची कृत्रिम टंचाई निर्माण करणे आणि शेतकऱ्यांना जादा दराने बियाणे विक्री करणाऱ्या जिल्ह्यातील सात कृषी सेवा केंद्रचालकांना विक्री थांबविण्याचे आदेश देण्यात आले. मंगळवारी त्यांची सुनावणी घेऊन त्यांच्या दुकानांची परवाने निलंबित केली जाईल. -- प्रकाश देशमुख, जिल्हा कृषी अधीक्षक