अवैध दारू विकणाऱ्या ढाब्यावर छापा, न्यायालयाकडून २७ हजारांचा दंड
By राम शिनगारे | Published: November 27, 2022 04:24 PM2022-11-27T16:24:37+5:302022-11-27T16:24:50+5:30
राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई : मालकासह पाच मद्यपींचा आराेपींत समावेश
औरंगाबाद: अवैध दारू विकणाऱ्यासह मद्य पिण्यासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या लिंबेजळगाव शिवारातील हॉटेल जय मल्हार येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापा मारला. या छाप्यात ढाबा मालकासह पाच मद्यपींना पकडण्यात आले. त्यांच्याविरोधात सात दिवसांत गंगापूर येथील प्रथमवर्ग न्यायालयात दोषारोपपत्र सादर करत आरोपींना हजर केले. न्यायालयाने त्यांना एकूण २७ हजार ५०० रुपयांचा दंड केला असल्याची माहिती ‘ड’ विभागाचे निरीक्षक शहाजी शिंदे यांनी दिली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ‘ड’ विभागाचे निरीक्षक शिंदे यांना जय मल्हार हॉटेलमध्ये अवैध दारू विक्रीसह विनापरवाना मद्य पिण्यासाठी ग्राहक बसल्याची माहिती मिळाली. त्यानुसार उपअधीक्षक प्रदीप पोटे यांच्या नेतृत्वातील पथकाने १८ नोव्हेंबर रोजी छापा मारला. यावेळी हॉटेल चालक अरुण बाबासाहेब दाणे (३२, रा. लिंबेजळगाव, ता. गंगापूर) याच्यासह पाच मद्यपी ग्राहकांना पकडण्यात आले.
या सर्वांच्या विरोधात दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला. त्यानंतर २५ नोव्हेंबर रोजी गंगापूर येथील प्रथमवर्ग न्यायालयात आरोपींना हजर करत दोषारोपपत्र सादर केले. न्यायालयाने हाॅटेल चालक दाणे याला २५ हजार रुपये आणि मद्य सेवन करणाऱ्या पाचजणांना प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड केला. ही कारवाई अधीक्षक संतोष झगडे यांच्या मार्गदर्शनात उपअधीक्षक प्रदीप पोटे, निरीक्षक शहाजी शिंदे, दुय्यम निरीक्षक एस. डी. मराठे, शिवराज वाघमारे, सहायक दुय्यम निरीक्षक सुभाष गुंजाळे, नवनाथ घुगे, जवान राहुल बनकर, योगेश घुनावत, विनायक चव्हाण यांच्या पथकाने केली.