वडिलांनी मित्राला मुलीवर लक्ष देण्यास सांगितले, त्याने ब्लॅकमेल करत केली 'चान्स'ची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2022 02:32 PM2022-12-30T14:32:32+5:302022-12-30T14:34:00+5:30
दामिनी पथकाने सापळा रचून पकडले, मुलीच्या आईचा विश्वासच बसेना
औरंगाबाद : ड्रायव्हर वडिलांनी दहावीत शिक्षण घेणाऱ्या मुलीवर लक्ष ठेवण्यास मित्राला सांगितले. मित्राने अल्पवयीन मुलीस ‘तू ज्या मुलासोबत बोलतेस, त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. हे सर्व पुरावे तुझ्या वडिलांना देणार आहे. वडिलांना सांगायचे नसेल तर, मला भेटायला ये आणि एक चान्स दे’, अशी मागणीच केली. त्यामुळे घाबरलेल्या मुलीने तीन दिवसांपासून जेवण केले नाही. शेवटी दामिनी पथकाला आपबीती सांगितली. त्यानुसार दामिनी पथकाने मुलीला बोलावलेल्या ठिकाणी सापळा रचून नराधमास पकडले. ही घटना हर्सूल परिसरात बुधवारी सायंकाळी घडली.
हर्सूल परिसरातील १६ वर्षांची मिताली (नाव बदलेले) दहावीच्या वर्गात शिक्षण घेते. तिचे वडील ड्रायव्हर, आई घरकाम करते. तिच्या वडिलांनी ३५ वर्षांच्या ड्रायव्हर मित्र गणेशला (नाव बदलेले) मुलीवर लक्ष ठेवण्यास सांगितले होते. गणेश हा मितालीला, ‘तुझी ज्या मुलासोबत मैत्री आहे. त्याची माहिती तुझ्या वडिलांना सांगतो. सांगायचे नसेल तर मला भेटायला ये आणि एक चान्स दे,’ अशी मागणी करीत होता. मागील काही दिवसांपासून त्याने तिला ब्लॅकमेल करणे सुरू केले. त्यामुळे तिने त्याचा नंबरही ब्लॉक केला. दामिनी पथकातील मनिषा बनसोडे हर्सूल परिसरातच राहतात.
मितालीने त्यांची भेट घेऊन २७ डिसेंबर रोजी आपबीती सांगितली. दामिनी पथकाच्या प्रमुख निरीक्षक आम्रपाली तायडे यांच्या सूचनेनुसार पोलिस हवालदार लता जाधव महिला पोलिस नाईक कल्पना खरात, सुजाता खरात, चालक बनसोडे यांनी तिची त्याचदिवशी हर्सूल परिसरात भेट घेतली; तसेच गणेशला फोन करून भेटण्यास बोलाविण्याच्या सूचना दिल्या. त्याने तिला २८ डिसेंबर रोजी सायंकाळी हर्सूल परिसरातील त्याच्या गाडीतच भेटण्यास बोलावले. त्यानुसार दामिनी पथकाने सापळा रचला. ती गणेशच्या बसमध्ये चढल्यानंतर त्याच्या पाठीमागून पथकातील दोन सदस्य गाडीत चढले. त्यांनी गणेशला पकडून भरोसा सेल येथे आणले.
मुलीच्या आईचा विश्वास बसेना
भरोसा सेल येथे निरीक्षक तायडे यांनी मितालीची आई, नराधम गणेशच्या पत्नीला बोलावून घेतले. तेव्हा दोघींचाही गणेशवर विश्वासच बसेना. त्याने केलेल्या कृत्याची कबुली सर्वांसमोर दिली, तेव्हा दोघींना धक्काच बसला. शेवटी मुलीच्या आईसह कोणीही तक्रार देण्यास नकार दिल्यामुळे गणेशवर कायदेशीर कारवाई करीत सोडून देण्यात आले.