बाथरूममध्ये उमेदवार क्रमांकाची अदलाबदल; चक्क होमगार्ड भरतीमध्येही डमी उमेदवार उभा
By सुमित डोळे | Published: September 4, 2024 11:40 AM2024-09-04T11:40:22+5:302024-09-04T11:42:18+5:30
३० हजार रुपये दर, २१ ऑगस्ट रोजी आरोपी यशस्वी, मंगळवारी मात्र महिला अंमलदाराच्या सतर्कतेमुळे अडकला
छत्रपती संभाजीनगर : होमगार्ड होण्यासाठी देखील काहींनी हजारो रुपये भरून स्वत:च्या जागी डमी उमेदवार उभा करण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या गोकुळ मैदानावर हा प्रकार उघडकीस आला. करण लालचंद खोलवाल (२६, रा. भोयगाव, ता. गंगापूर) हा एका मूळ उमेदवाराच्या जागेवर मैदानी चाचणीसाठी उभा राहिला होता.
जिल्ह्याची होमगार्ड भरती अधीक्षक कार्यालयाच्या मैदानावर सुरू आहे. कागदपत्र पडताळणी नंतर छाती, उंची मोजून गोळा फेक व १६०० मीटर धावण्याची चाचणी होते. यासाठी उमेदवारांना चेस्ट क्रमांक देण्यात येेतो. मंगळवारी सकाळी १०.३० वाजता भरतीस प्रारंभ झाला. अंमलदार अनिषा वडमारे यांच्याकडे २०़ उमेदवारांची जबाबदारी होती. त्यापैकी काहींनी वडमारे यांच्याकडे लघुशंकेला जाण्याची परवानगी मागितली. दहा मिनिटांनी उमेदवार परत आले. गोळाफेक चाचणी सुरू झाल्यावर वडमारे यांना एक उमेदवार काळा मास्क, टोपी परिधान केलेला दिसला. विचारणा केल्यावर त्याने सर्दीचे कारण सांगितले. मात्र, बोलण्यात अडखळल्याने संशय वाढला. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चौकशीत त्याने तो मूळ उमेदवार रमेश ताराचंद राठोड (रा. पैठण) याच्या जागी मैदाणी चाचणी देण्यासाठी उभा राहिल्याची कबुली दिली.
स्वच्छतागृहात अदलाबदली
मूळ उमेदवार रमेश डिटेलिंग (प्राथमिक तपासणी) होईपर्यंत मैदानावरच होता. मात्र, लघुशंकेचे कारण करून तो जेव्हा स्वच्छतागृहात गेला. आरोपी करण त्यापूर्वीच लघुशंकेत पोहोचला होता. तेथे त्याने रमेश चा चेस्ट क्रमांक व कपड्यांची अदलाबदली केली. रमेश त्यानंतर मैदानावरून पसार झाला. करण वर याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक निरीक्षक योगेश गायकवाड यांनी त्याला तत्काळ अटक केली.
३० हजार रुपये दर
वीस दिवसांपासून गोकुळ मैदानावर होमगार्डसाठी मैदानी चाचणी सुरू आहे. आरोपी करण यापूर्वी २१ ऑगस्ट रोजी अक्षय कृष्णा लाड याच्या जागी डमी उमेदवार म्हणून मैदानी चाचणी देण्यात यशस्वी ठरला. रमेश साठी त्याला कैलास गंगाराम राठोड (रा. डोनगाव, ता. पैठण) ने ३० हजार रुपये दिले होते. अक्षय ने देखील २५ हजार रुपये दिल्याचे त्याने कबूल केले. करणसह रमेश, कैलास व अक्षयलाही लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.