चक्क बिअर शॉपीचा बनवला बनावट परवाना; उद्घाटनाच्या दुसऱ्याच दिवशी 'एक्साईज'चा छापा
By राम शिनगारे | Published: January 4, 2023 01:25 PM2023-01-04T13:25:41+5:302023-01-04T13:26:31+5:30
बाप-लेकाचा कारनामा उघडकीस; उत्पादन शुल्क विभागाने छापा मारत लेकास पकडले तर बापासह एकजण फरार
औरंगाबाद : चक्क ग्रीन बिअर शॉपीच्या नावाने बनावट परवाना तयार करून बिअरची विक्री करण्यात येत होती. हा गोरखधंदा अनेक दिवसांपासून सुरू असतानाच राज्य उत्पादन शुल्क विभागाला त्याची माहिती मिळताच छापा मारून बनावट बिअर शॉपी चालविणाऱ्या मुलास पकडले. तर त्याच्या बापासह एकजण फरार झाल्याची माहिती निरीक्षक राहुल गुरव यांनी दिली.
वडील बाबासाहेब केशवराव पवार (रा. क्रांतीनगर, साजापुर, ता. औरंगाबाद), मुलगा अजय बाबासाहेब पवार आणि संतोष त्रिभुवन अशी आरोपींची नावे आहेत. सोलापुर-धुळे महामार्गावरील साजापुर परिसरात हॉटेल मराठाच्या मागील बाजुस एका खोलीमध्ये उत्पादन शुल्क विभागाचा ग्रीन बिअर शॉपी या नावाने बनावट परवाना तयार करून बापलेक अवैधरित्या बिअरची विक्री करीत होते. याविषयी गोपनीय माहिती मिळाल्यानंतर अधीक्षक संतोष झगडे यांच्या नेतृत्वातील पथकाने त्याठिकाणी छापा मारला. तेव्हा अजय पवार हा मिळून आला. त्याच्या वडिलाच्या नावाने संतोष त्रिभुवन याने हा बनावट परवाना तयार करून दिल्याची माहिती पकडलेल्या आरोपीने दिली. याठिकाणी बिअरच्या विक्रीसाठी ठेवलेल्या २९ बॉटल जप्त केल्या. त्याशिवाय १२ हजार ७२५ रुपयांचा इतर मुद्देमालही उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने जप्त केला. या प्रकरणी दारूबंदी कायद्यासह भादवि कलमान्वये तिघांच्या विरोधात गुन्हा नोंदवला. ही कारवाई अधीक्षक संतोष झगडे यांच्या मार्गदर्शनात उपअधीक्षक प्रदीप पोटे, संजय तवसाळकर, निरीक्षक राहुल गुरव, दुय्यम निरीक्षक जी.बी. इंगळे, बी.आर. वाघमोडे, भरत दौंड, ए.ई. तातळे, प्रदीप मोहिते, श्रीमंत बोरुडे यांच्यासह इतरांनी केली..
उद्घाटनाच्या दुसऱ्याच दिवशी पकडले
बनावट परवाना तयार करून ३१ डिसेंबर रोजी ग्रीन बिअर शॉपीचे उद्घाटन केले होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा मारला. त्यात बिअरच्या मालासह सर्व साहित्यही जप्त करण्यात आले. या प्रकरणी अधिक तपास निरीक्षक राहुल गुरव करीत आहेत.