चक्क न्यायालयाच्या नावाने बनवली लाखो रुपयांच्या दंडाची बनावट नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2024 01:28 PM2024-10-03T13:28:38+5:302024-10-03T13:30:18+5:30
वेबसाईटवरुन लेटरहेड, न्यायाधीशांच्या सही, शिक्क्यांचा वापर; न्यायालयाच्या नावाने.६२ लाखांचा दंड भरण्याची बनावट नोटीस तयार करून एकास पाठवली
छत्रपती संभाजीनगर : न्यायालयाच्या नावे पाच जणांना १ लाख ६२ हजार दंड भरण्याची बनावट नोटीस पाठवून फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याची बाब उघडकीस आली आहे. न्यायालयाच्या वतीने अधीक्षक विवेक सरोसिया (५७) यांच्या तक्रारीवरून वेदांतनगर पोलिस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
फुलंब्री तालुक्यातील निधोना येथील विठ्ठल आव्हाड (४१) यांना काही दिवसांपूर्वी न्यायालयाकडून दंड भरण्याबाबत नोटीस प्राप्त झाली. नोटीसमध्ये म्हटल्यानुसार, शरद दिलीप नरवडे (२१, रा.निधोना) यांनी न्यायालयात दाखल क्रिमिनल केस क्र. (३४७/२०२४) शरद दिलीप नरवडे विरुद्ध विठ्ठल आव्हाड, कांताबाई आव्हाड, सागर आव्हाड, रुख्मनाबाई सोनवणे, संदीप सोनवणे. त्यावर तृतीय न्यायदंडाधिकारी यांनी कलम ६३ सीआरपी प्रमाणे दंड भरून २५ सप्टेंबरपर्यंत पावती डाक पोस्टाने पाठवावी, असा उल्लेख होता. यात प्रत्येकाच्या नावासमोर दंडाची रकमेचा उल्लेख हाेता. या नोटिसीमुळे घाबरलेल्या विठ्ठल यांनी २३ सप्टेंबर रोजी न्यायालयात वरिष्ठ लिपिक शेख रफिक यांना भेटले. त्यांना प्राप्त नोटीसबाबत विचारणा केली. न्यायालयाच्या वतीने याबाबत चौकशी करण्यात आली असता, नोटीस बनावट असल्याचे समोर आले.
नेमका काय प्रकार घडला?
जुलै, २०२४ मध्ये न्यायालयात कर्मचाऱ्यांच्या विविध पदांच्या भरतीबाबत कार्यालयाच्या संकेतस्थळावर नोटीस प्रदर्शित करण्यात आली होती. ही नोटीस मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीशांच्या सही व शिक्क्याने प्रदर्शित करण्यात आली होती. आरोपींनी त्या नोटीसच्या लेटर हेडमधील मजकुरात बदल करून न्यायालयाची मोहोर, न्यायाधीशांचे पद, सही, शिक्क्याचा वापर करून दंडाचा उल्लेख करत बनावट नोटीसच तयार केली. विठ्ठल यांच्यासह तालेब सत्तार शेख व शोहेल लतिफ शेख यांना ही नोटीस पाठवून आर्थिक फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. निरीक्षक प्रवीणा यादव यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला. उपनिरीक्षक वैभव मोरे अधिक तपास करत आहेत.