नवरी मिळेना शेतकरी नवऱ्याला, शेती पाहिजे पण शेत कसणारा नवरा नको
By प्रशांत तेलवाडकर | Published: December 4, 2023 07:00 PM2023-12-04T19:00:30+5:302023-12-04T19:00:46+5:30
शेतकरी नवरा नको गं बाई; पस्तिशीतही नवरी मिळेना !
छत्रपती संभाजीनगर : तुळशीचे लग्न लागले आणि लग्नसराईला धूमधडाक्यात सुरुवात झाली. पण, या धामधुमीपासून अनेक नवरदेव वंचित आहेत. कारण, त्यांची वयाची पस्तिशी ओलांडली, पण अजून त्यांना वधू मिळेना. त्यात शेतकरी तरुणांचे तर हाल विचारूच नका. कोट्यवधीची शेतजमीन आहे, पण तरुणी लग्न करायला तयार नाहीत. कारण, शेती पाहिजे पण शेतकरी नवरा नको गं बाई, असे वधू व तिच्या आई-वडिलांची भूमिका आहे. यामुळे वय वाढत आहे व लग्नही जुळत नाही.
मुलींपेक्षा मुलांच्या लग्नाची चिंता वाढली
मागील दहा वर्षांत तरुणांची संख्या वाढली व तरुणींची संख्या त्यातुलनेत कमी होत आहे. आता काही व्यावसायिक वधू-वर सूचक मंडळात तरुणींची नाव नोंदणी मोफत केली जात आहे. १ हजार तरुणांमागे ९५० तरुणी असल्याने तरुणांच्या लग्नाची चिंता वाढली आहे.
काय कारणे आहेत.
१) मुलींच्या अपेक्षा वाढल्या : आयटी क्षेत्रात गलेलठ्ठ पॅकेज मिळू लागल्याने तरुणींचा ओढा आयटी क्षेत्रातील तरुणांशी लग्न करण्याकडे आहे.
२) मुंबई-पुणे-बंगलोर : पुणे, मुंबई- बंगलोर- हैदराबाद या महानगरात बड्या बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत. तेथील पगारही लाखोत आहे. त्यातुलनेत मराठवाड्यात कमी पगार मिळतो. यामुळे या महानगरातील तरुणाशी आपल्या मुलीचे लग्न लागावे, अशी मुलीच्या आई व वडिलांची इच्छा आहे.
३) समानक्षेत्रातील स्थळ : मुलगी इंजिनिअर, डॉक्टर, आर्किटेक्ट, सीए असेल तर त्यांना त्यांच्याच क्षेत्रातील तरुणाचे स्थळ शक्यतो पाहिले जाते. अपेक्षेपेक्षा कमी स्थळ मिळाले तर तरुणी नकार देतात.
या मुलांच्या लग्नाची चिंता
शेतकरी : शेतकरी तरुण असेल तर तरुणी त्याच्याशी लग्न करण्यास तयार होत नाही, कारण शेतातील कामाची कष्ट करण्याची मानसिकता नाही. सततच्या ओल्या व कोरड्या दुष्काळाने शेतकऱ्यांचे जीवन अधिक कठीण झाले आहे. शेतकरी तरुण उच्च शिक्षित असला तरी नकारच मिळतो. यामुळे शेतकरी तरुणांचे लग्न रखडत आहे.
पुरोहित : पुरोहितांचा व्यवसाय हंगामी मानला जातो. आज अनेक पुरोहितांना मोठी कमाई असली तरी तरुणी पुरोहित तरुणाला नकार देत असल्याने अनेक पुरोहितांचे वय ४५ वर जाऊन ठेपले तरी लग्न होत नाही.
कमी शिक्षित : तरुणी अभ्यासात हुशार असतात. हे दरवर्षीच्या निकालावरून सिद्ध असते. तसेच उच्च शिक्षितांमध्ये तरुणींचे प्रमाण जास्त आहे. तरुणींच्या तुलनेत तरुणांचे कमी शिक्षण हासुद्धा ‘लग्न’ जमण्यात अडसर ठरत आहे.
कमी पगार : अनेक तरुण सर्वसामान्य नोकरी करतात. त्यांचा पगारही कमी आहे. कमीत कमी ५० हजार रुपयांपेक्षा दरमहा जास्त पगार मिळविणाऱ्या तरुणाचे स्थळ वधूकडील मंडळी शोधत असतात.
‘जुळवून घेणे’ हाच पर्याय
उच्च शिक्षित तरुणींना त्यांच्या क्षेत्रातील तरुण असावा असे वाटते. ही अपेक्षा योग्य आहे, पण कमी शिक्षित तरुणींचाही उच्च शिक्षित व मोठ्या पॅकेजच्या तरुणाशीच लग्न करण्याकडे कल असतो. यात काहीच हरकत नाही. पण जर वयाची तिशी ओलांडल्यावर तरुणींनीही आपल्या अपेक्षा कमी करून चांगले स्थळ असले तर ‘जुळवून घेणे’ महत्त्वाचे आहे.
-सुधीर नाईक, वधू-वर सुचक मंडळ