शेतकरी पुत्राने करून दाखवले, अक्षय पडूळ विक्रीकर निरीक्षक परीक्षेत राज्यात अव्वल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2022 02:43 PM2022-11-24T14:43:19+5:302022-11-24T14:44:33+5:30
बीएस्स्सी शेवटच्या वर्षात स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. चार वर्षे निराश न होता सातत्याने अभ्यास करत राहिलो.
औरंगाबाद : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विक्रीकर निरीक्षक पदासाठी जुलैमध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेची अंतरिम निवड, सर्वसाधारण गुणवत्ता यादी बुधवारी जाहीर झाली. त्यात लाडसावंगी येथील शेतकऱ्याचा मुलगा असलेल्या अक्षय दिवाणराव पडूळ याने राज्यात अव्वल येण्याचा मान पटकावला. शिक्षणात ताकद आहे. सातत्याने अभ्यास आणि मेहनतीने काहीही शक्य होऊ शकते. त्याचा अनुभव आल्याचे अक्षय पडूळ याने ‘लोकमत’ला सांगितले.
विक्रीकर निरीक्षक या पदाची जाहिरात २०२१ मध्ये प्रकाशित झाली होती. जुलै २०२२ मध्ये मुख्य परीक्षा झाली. बुधवारी अंतरिम निवड यादीत ६०९ जणांचा समावेश असून मंगेश खरात, उमेश पाटील, अविनाश भोसले या मित्रांचाही अंतिम निवड यादीत समावेश आहे. लाडसावंगी गावातील शिक्षक, विद्यार्थ्यांसह राजकीय पुढाऱ्यांच्या उपस्थितीत मिरवणूक काढून गावकऱ्यांनी अक्षयचा सन्मान केला, असे डाॅ. पंजाबराव पडूळ यांनी सांगितले. चित्तेगाव येथील कृष्णा प्रकाश क्षीरसागर, पूर्णा येथील विलास रावसाहेब भोसले, पालम येथील चंद्रकांत सोनटक्के यांचाही अंतरिम यादीत समावेश आहे.
आई-वडिलांचे श्रम, अभ्यासात सातत्य
बीएस्स्सी शेवटच्या वर्षात स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. चार वर्षे निराश न होता सातत्याने अभ्यास करत राहिलो. आई, वडील प्रेरणा देत राहिल्याने हे यश मिळाले. राज्यसेवा पूर्व दिली आहे. मुख्य परीक्षा जानेवारीत होणार आहे. त्याची तयारी सुरू आहे. गावकरी आप्तेष्टांनी केलेल्या सन्मानाने भारावलो असून पुढचा टप्पा गाठायचा हुरूप त्यामुळे मिळाला असल्याचे अक्षय यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.