गॅस कटरने एटीएम फोडताना लागली आग; साडेतेरा लाख रुपये जळून खाक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 11:17 AM2024-07-16T11:17:52+5:302024-07-16T11:18:33+5:30
छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील घटना; चोरट्यांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल
दौलताबाद (छत्रपती संभाजीनगर) : छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील माळीवाडा येथील नाशिक मार्गावर असलेले भारतीय स्टेट बॅंकेचे एटीएम चोरटे गॅस कटरद्वारे फोडताना लागलेल्या आगीत १३ लाख ६१ हजार ८०० रुपयांची रक्कम जळून खाक झाली आहे. ही घटना सोमवारी पहाटे ४:१५ वाजेच्या सुमारास घडली.
माळीवाडा येथील नाशिक मार्गावर भारतीय स्टेट बॅंकेची शाखा आहे. या शाखेच्या बाजूलाच एटीएम व सीडीएम मशिन आहे. सोमवारी पहाटे ४:१५ वाजेच्या सुमारास एका पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये तीन ते चार अज्ञात चोरटे आले. त्यांनी त्यांची कार बँकेसमोर उभी करून तोंडाला कपडा बांधलेल्या दोन व्यक्तींनी एटीएममध्ये प्रवेश करून शटर बंद केले. त्यानंतर त्यातील एका व्यक्तीने एटीएममधील सीसीटीव्ही कॅमेरा तोडला व सोबत आणलेल्या गॅस कटरच्या साह्याने एटीएम मशिन कापणे सुरू केले. मशिनचा समोरचा भाग कापला गेला; पण आतील भाग तसाच असल्याने त्यात गॅस कटरची ठिणगी पडली. त्यामुळे एटीएममधील १३ लाख ६१ हजार ८०० रुपयांची रक्कम जळू लागली. ही बाब एटीएम केंद्राच्यावरील मजल्यावर राहणारे रहिवाशी हिवाळे यांच्या निदर्शनास आली. त्यांनी तत्काळ बॅंकेचे शाखा प्रबंधक सोमनाथ सोळंके व पोलिसांना माहिती दिली. तसेच, आजूबाजूच्या व्यक्तींना फोन केले. काही वेळात तेथील सायरन वाजायला सुरुवात झाली. त्यामुळे बँकेच्या आसपास राहणारे काही ग्रामस्थ घराबाहेर निघाले. ही बाब चोरट्यांच्या लक्षात येताच त्यांनी गॅस कटर मशिन व अन्य साहित्य तेथेच टाकून पळ काढला.
पोलिसांनी केला पंचनामा
याबाबत माहिती मिळाल्यानंतर दौलताबाद पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जनार्दन साळुंखे, सहायक पोलिस निरीक्षक संजय गीते, रफीक पठाण, खुशाल पाटील, सुदर्शन राजपूत हे घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी पंचनामा केला. त्यानंतर ठसे तज्ज्ञ व श्वास पथकास पाचारण करण्यात आले. तोपर्यंत बॅंकेचे शाखा व्यवस्थापक सोळंके दाखल झाले. दरम्यानच्या काळात उपस्थितांनी आग विझवली. तोपर्यंत एटीएम मशिनमधील सर्व नोटा जळून खाक झाल्या होत्या. याप्रकरणी बॅंकेचे शाखा व्यवस्थापक सोमनाथ सोळंके यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वसंत शेळके हे करीत आहेत.
डिजिटल कॅमेऱ्यात घटना चित्रीत
चोरट्यांनी एटीएम केंद्रात प्रवेश केल्यानंतर तेथील सीसीटीव्ही कॅमेरा तोडला ताे बंद हाेता. त्याच्या बाजूला दुसरा डिजिटल कॅमेरा होता. त्या कॅमेऱ्यात ही घटना चित्रीत झाली आहे. पोलिस तपासासाठी ही बाब महत्त्वपूर्ण ठरणार आहे. पोलिसांनी हे सीसीटीव्ही फुटेज जप्त केले आहे.