नीट परीक्षेची तयारी करण्यासाठी मामाकडे आलेल्या अल्पवयीन मैत्रिणीवर मित्राचा अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 05:46 PM2024-09-19T17:46:27+5:302024-09-19T17:47:20+5:30
पोलिसांनी अत्याचार करणाऱ्या तरुणास जेरबंद केले आहे
वाळूज महानगर : नीट परीक्षेची तयारी करत असलेल्या अल्पवयीन मुलीवर तिच्या मित्राने अनेकदा अत्याचार केल्याची खळबळजनक घटना वाळूज उद्योगनगरीत उघडकीस आली. याप्रकरणी १७ वर्षीय पीडितेच्या तक्रारीवरून आरोपी चव्हाण (२२) विरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पीडिता प्राची (नाव बदलले आहे) ही काही दिवसांपूर्वी नीट परीक्षेची तयारी करण्यासाठी उद्योगनगरीत मामाच्या घरी आली होती. एका महाविद्यालयात अकरावीला प्रवेश घेऊन ती खाजगी क्लासेसमध्ये नीटची तयारी करीत होती. परिसरात राहणाऱ्या करण चव्हाण या तरुणासोबत तिची ओळख झाली. सतत भेटीगाठीतून त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले.
तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढल्यानंतर करणने चार महिन्यांपूर्वी २२ मे रोजी सायंकाळी तिला भेटायला बोलावून अत्याचार केला. २ ऑगस्टला ती क्लासेसला जात असताना तिला मोकळ्या जागेत नेऊन पुन्हा अत्याचार केला होता. १६ ऑगस्टला करणने तिला भेटण्यासाठी बोलावून पुन्हा अत्याचार केला. तो सतत अत्याचार करीत असल्यामुळे घाबरलेल्या प्राचीने ही बाब मामा व कुटुंबीयांना सांगितली.
अत्याचारी मित्र जेरबंद
प्राचीने दिलेल्या माहितीने कुटुंब हादरून गेले. कुटुंबीयांनी तिला धीर देत एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात नेले. पोलिस निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी आरोपी करण चव्हाण याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून बुधवारी परिसरातून त्याला जेरबंद केले. उपनिरीक्षक भाग्यश्री शिंदे या पुढील तपास करीत आहेत.