तलावातील खड्ड्यांचा अंदाज न आल्याने तरुण गणेशभक्त मूर्तीसह बुडाला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2024 04:29 PM2024-09-18T16:29:29+5:302024-09-18T16:30:08+5:30
मित्रांसोबत फोटो काढल्यानंतर विसर्जनासाठी तरुण मूर्तीसह तलावात उतरला होता; एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूने मातापिता कासावीस
- संतोष उगले
वाळूज महानगर ( छत्रपती संभाजीनगर) : घरातील लाडक्या बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी घाणेगाव पाझर तलावात उतरलेल्या २१ वर्षीय तरूणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना १७ सप्टेंबर रोजी सायंकाळी घडली. अभय सुधाकर गावंडे (वय २१, रा. नर्सरी कॉलनी, रांजणगाव ता. गंगापूर जि. छञपती संभाजीनगर) असे मृत तरूणाचे नाव आहे. एकूलता एक मुलाच्या मृत्यूने त्याच्या आई-वडीलांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
अभयचे वडील सुधाकर गावंडे हे उद्योगनगरितील एका खाजगी कंपनीमध्ये कामगार म्हणून काम करतात. पत्नी आणि एकुलता एक मुलगा अभय यांच्यासह ते रांजणगावात राहतात. ७ सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात अभयने घरी लाडक्या बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना केली. त्यानंतर कुटूंबीयांसह दहादिवस मनोभावे पुजा-अर्चा करून १७ सप्टेंबर रोजी तिघा मित्रांसह तो श्रींचे विसर्जन करण्यासाठी लगतच्या घाणेगाव पाझर तलावाकडे गेला होता. मूर्तीसह तलावात उतरलेला अभय खड्ड्यांचा अंदाज न अचानक पाण्यात बुडाला. सोबतच्या मित्रांना देखील पोहता येत नव्हते. त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला असता काही तरुण धावून आले. मात्, त्यांच्या हाती अभय लागला नाही. काही वेळाने अग्निशमन दलाच्या जवानांनी अभयचा मृतदेह बाहेर काढला. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.
खड्ड्यांचा अंदाज न आल्याने ‘मूर्तीसह तोही बुडाला’
लाडक्या गणरायाचे विसर्जन करण्यापूर्वी अभयने मृती हातात घेवून मित्रांसोबत फोटो काढले. त्यानंतर विसर्जन करण्यासाठी मित्रांसह तोही मूर्तीसह तलावामध्ये उतरला. गुडघ्यापर्यंत पाणी असल्याने तो इतर मित्रांपासून आतल्या बाजूने दुर-दुर जात होता. दरम्यान, मूर्तीसह अभय अचानक पाण्यात बुडाला. दोन वेळा गटांगळ्या खाऊन अभय वरती आला मात्र, त्यानंतर तो खोल पाण्यात बुडाला तो वर आलाच नाही. अभयला व त्याच्या मित्रांना पोहता येत नसल्याने सर्वांचा नाईलाज झाला.