शाळेत नोकरीसाठी मुलाखतीस आलेल्या तरुणीवर अत्याचार, तथाकथित समाजसेवक अटकेत
By राम शिनगारे | Published: April 26, 2023 05:45 PM2023-04-26T17:45:51+5:302023-04-26T17:46:22+5:30
अत्याचाराचा व्हिडिओ दाखवत करत होता तरुणीस ब्लॅकमेल
छत्रपती संभाजीनगर : शाळेत मुलाखतीला गेलेल्या तरुणीला ओळखीच्या तरुणाने वडापाव व पिण्याच्या पाण्यातुन बेशुद्ध होण्याचे औषध देऊन घरी नेले. त्याठिकाणी तरुणीवर अत्याचार करीत अश्लिल व्हिडिओ तयार केला. हा व्हिडिओ नातेवाईकांना पाठविण्याची धमकी देत दोन वर्षांपासून अत्याचार करणाऱ्या आरोपीच्या विरोधात जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला. पोलिसांनी आरोपीस तात्काळ अटक केल्याची माहिती निरीक्षक अशोक भंडारे यांनी दिली.
सय्यद जावेद सय्यद जफर (33, रा. रहीमनगर, ग.नं. ३, अल्तमश कॉलनी) असे आरोपीचे नाव आहे. जिन्सी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडिता हा बेरोजगार आहे. तिला शाळेत नोकरीला लावतो असे अमिष दाखवून आरोपी सय्यद जावेद याने ओळख निर्माण केली. त्यातुनच रहेमानिया कॉलनीतील एका शाळेत मुलाखत देण्यासाठी जुन २०२१ मध्ये आली होती. मुलाखत देऊन् तरुणी बाहेर पडल्यानंतर आरोपीने तिला वडपाव खाण्यासासाठी दिला. त्यानंतर तरुणाने पाणी पिण्यास दिले. त्यानंतर तरुणीला चक्कर आली. तेव्हा तरुणाने तुला रिक्षा स्टॅडवर सोडतो म्हणून दुचाकीवर बसवून स्वत:च्या घरी नेली.
घरी गेल्यानंतर तरुणीला बेशुद्ध पडली. तेव्हा त्याने तरुणीला निवस्त्र करीत व्हिडिओ बनवला. हा व्हिडिओ नातेवाईकांमध्ये व्हायरल करण्याची धमकी देऊन तरुणीला सय्यद जावेद हा सतत घरी बोलवत होता. तरुणी बदनामीच्या भितीने घरी जात होती. घरी गेल्यानंतर जावेद तिच्यावर अत्याचार करीत असे. हा प्रकार २५ एप्रिलपर्यंत सुरू होता. शेवटी त्रस्त झालेल्या तरुणीने जिन्सी पोलिस ठाणे गाठत तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल होताच आरोपीला अटक केली. अधिक तपास निरीक्षक अशोक भंडारे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक मिरा चव्हाण करीत आहेत. दरम्यान, आरोपीला तीन दिवसांची पोलिस कोठडी न्यायालयाने मंजुर केली आहे.
समाजसेवक म्हणून मिरवायचा
आरोपी सय्यद जावेद हा मोठमोठ्या व्यक्तींकडून गोरगरीबांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत होता. संस्थाकडून मिळालेली मदत गोरगरीबांना वाटत असे. त्यातुन सगळीकडे समाजसेवक म्हणून मिरवून घेत होता. प्रत्येकाचे काम करून देण्याचेही आश्वासन आरोपी देत असे, अशी माहिती जिन्सी पोलिसांनी दिली.