सुट्यात मावशीकडे आलेल्या बालिकेचा सोसायटीच्या स्विमिंग पूलमध्ये पोहताना बुडून अंत
By बापू सोळुंके | Published: April 29, 2023 08:11 PM2023-04-29T20:11:58+5:302023-04-29T20:12:07+5:30
मावशीची मुलगी स्विमिंग करण्यासाठी जात असल्याने तिनेही तिच्यासोबत पोहण्यासाठी इच्छा व्यक्त केली.
छत्रपती संभाजीनगर: शाळेला सुट्या लागल्यामुळे मावशीच्या घरी आलेल्या ९ वर्षिय बालिकेचा सोसायटीतील स्विमिंग पूलमध्ये पोहताना बुडून मृत्यू झाल्याची घटना २८ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता जालानननगर येथे घडली. याप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
डिना रितेश बोराळे(९,रा. जशोदानगर, सुरत, गुजरात)असे मृत बालिकेचे नाव आहे. डिनाचे वडील खाजगी नोकरी निमित्त गुजरात येथे राहतात. तर तिची आई गृहिणी आहे. त्यांना डिना ही एकुलती एक मुलगी होती. तिने नुकतीच तिसऱ्या वर्गाची परीक्षा दिली होती. शाळांना सुट्टी लागल्याने दोन दिवसांपूर्वी जलाननगर येथे राहणाऱ्या मावशीच्या घरी आली होती. मावशीची मुलगी स्विमिंग करण्यासाठी जात असल्याने तिनेही तिच्यासोबत पोहण्यासाठी इच्छा व्यक्त केली. यामुळे नातेवाईकांनी तिला मावसबहिणीसोबत स्विमिंगपूल येथे पाठविले.
तेथे जाताच तिने स्विमिंग पूलमध्ये उडी मारली. पोहयला येत नसल्याने ती पाण्यात बुडाली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर प्रशिक्षकांनी तिला पाण्यातून बाहेर काढले. यानंतर त्यांनी तिला बेशुद्धावस्थेत घाटीत दाखल केले. अपघात विभागातील डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. सातारा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असुन पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव सानप करीत आहे.