चांगली सुरुवात; डीएमआयसीमध्ये २७ उद्योगांची ५०० कोटींची गुंतवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2023 03:00 PM2023-01-06T15:00:40+5:302023-01-06T15:01:04+5:30
महाएक्स्पोच्या उद्घाटन समारंभात उद्योगमंत्र्यांच्या हस्ते तीन उद्योगांना भूखंडाचे पत्र
औरंगाबाद : दिल्ली मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉरच्या शेंद्रा आणि बिडकीन औद्योगिक वसाहतँत २७ उद्योजकांनी ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून या उद्योगांमुळे थेट १५०० जणांना रोजगार मिळणार आहे, अशी घोषणा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी येथील ऑरिकसिटीत आयोजित महाएक्स्पोच्या उद्घाटन समारंभात गुरुवारी केली.
यातील तीन उद्योगांना भूखंड वाटपाचे पत्र उद्योगमंत्री उदय सामंत आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. सामंत म्हणाले की, ऑरिक सिटीच्या दिल्ली,मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉरअंतर्गत बिडकीन आणि शेंद्रा औद्योगिक पट्ट्यात सुमारे दहा हजार एकर जमीन उपलब्ध आहे. सेव्हन स्टार औद्योगिक सुविधांसह एवढी मोठी जमीन उपलब्ध असलेली देशातील पहिली औद्याेगिक वसाहत आहे. येथे जास्तीत जास्त उद्योगांनी गुंतवणूक करावी, यासाठी ऑरिक सिटी, उद्योग विभाग आणि स्थानिक उद्योजकांच्या संघटना प्रयत्न करीत असतात. या प्रयत्नांना आता यश येऊ लागले आहे. २७ उद्योगांनी सुमारे ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक येथे केली आहे.
या उद्योगांमुळे सुमारे पंधराशे जणांना थेट रोजगार मिळणार आहे. डीएमआयसीमध्ये भूखंड घेणाऱ्या संगीता भास्कर आहेर, एस.के. इंजिनिअरिंगच्या संतोष कडदे आणि प्राईम ॲक्रा क्राफ्टचे गंगा डोंगरे यांना उद्योगमंत्री सामंत, केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड आणि पालकमंत्री संदीपान भूमरे यांच्या हस्ते भूखंड वाटप (प्लॉट अलॉटमेंट लेटर) प्रपत्र प्रदान करण्यात आले.
उद्योजकांचा हिरमोड
मसिआच्या महाएक्स्पोचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार होते. मात्र पंतप्रधान ऑनलाइन आले नाही. तर विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे कारण पुढे करीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा दौरा ऐनवेळी रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आल्याने उद्योजकांचा हिरमोड झाला. उद्योगमंत्री सामंत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी नंतर व्हिडीओ कॉन्फरन्सच्याद्वारे उपस्थितांना मार्गदर्शन केले.