दहशत पसरविण्यासाठी जामिनावरील गुंडाची खुलेआम तलवारबाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2022 01:39 PM2022-02-25T13:39:46+5:302022-02-25T13:40:01+5:30
आठ दिवसांपूर्वी कारागृहातून सुटलेल्या आरोपीची तलवारीने दहशत
औरंगाबाद : आठ दिवसांपूर्वी खुनाच्या घटनेतील आरोपी कारागृहातून जामिनावर बाहेर आला होता. त्याने चंपा चौकात तलवार घेऊन व्यापाऱ्यांमध्ये दहशत पसरवली. एका रिक्षासह चारचाकी गाडीच्या काचा फोडल्याची घटना चंपा चौकात गुरुवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली. घटनेची माहिती समजताच जिन्सी, सिटी चौक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.
छावणीतील हॉटेल, बांधकाम व्यावसायिकाच्या २८ डिसेंबर २०१७ रोजी झालेल्या निर्घृण खून प्रकरणात शेख अश्पाक शेख इसाक उर्फ अश्पाक पटेल (रा़ शहाबाजार) हा आरोपी आहे. हा खटला न्यायप्रविष्ट असून अश्पाक पटेल हा हर्सूल कारागृहामध्ये कैद होता़ आठ दिवसांपूर्वीच अश्पाक जामिनावर सुटला होता. अश्पाक गुरुवारी दहा वाजेच्या सुमारास चंपा चौकात आला़ तो तलवार फिरवत शिवीगाळ करत होता़ रस्त्याने येणारे-जाणारे नागरिक भयभीत झाले होते़ चौकातील दुकाने बंद झाली होती़ नागरिक अश्पाकपासून दूर पळत होते़ रस्त्याने जाणारी एक कार आणि रिक्षावर त्याने हल्ला करून त्यांच्या काचा फोडल्या़ हा प्रकार पोलिसांना कळताच सिटी चौक आणि जिन्सी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक गोकुळ ठाकूर आणि सिटी चौकचे सहायक पोलीस निरीक्षक मोहसीन सय्यद यांचे पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांना पाहताच अश्पाक पसार झाला़ या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. अफवा पसरल्यामुळे पोलीस उपायुक्त दीपक गिर्हे, सहायक आयुक्त निशिकांत भुजबळ, अशोक थोरात, वरिष्ठ निरीक्षक अशोक गिरी, निरीक्षक विनोद सलगरकर, निरीक्षक राजेश मयेकर फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिस्थिती तत्काळ पूर्ववत केली.
शहर पोलीस गुंडगिरी खपवून घेणार नाहीत : आयुक्त
चंपा चौकातील घटनेच्या प्रकरणात बेकायदा शस्त्र बाळगल्याचा गुन्हा नोंदविण्यात येईल. आरोपीस लवकरच अटक केली जाईल. तसेच कोणी गुंडगिरी करण्याचा प्रयत्न करीत असेल तर शहर पोलीस हे खपवून घेणार नाहीत. त्याविरोधात कडक कारवाई केली जाईल.
- डॉ. निखिल गुप्ता, पोलीस आयुक्त