कामाच्या वेळात हृदयविकाराचा झटका हा अपघातच; वारसांना भरपाई देण्याचे कोर्टाचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 11:50 AM2022-05-26T11:50:45+5:302022-05-26T11:51:25+5:30
कामगार न्यायालय : कामगार नुकसान भरपाई कायद्याअंतर्गत आदेश
औरंगाबाद : ‘हृदयविकाराचा झटका हा अपघातच’ असल्याचा अर्जदारांचा युक्तिवाद ग्राह्य धरून कामगार नुकसान भरपाई आयुक्त तथा कामगार न्यायालयाच्या न्यायाधीश व्ही. एस. देशमुख यांनी मृत वाहनचालक साहेबराव सरोदे यांची पत्नी आणि वारसांना ट्रकमालक आणि विमा कंपनी यांनी संयुक्तरीत्या ६ लाख ७७ हजार ७६० रुपये १२ टक्के व्याजासह नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला. तसेच ट्रकमालकाला न्यायालयाने ३ लाख ३८ हजार ८८० रुपये दंड ठोठावला. त्याने सरोदे यांच्या अंत्यविधीचा खर्च म्हणून ५ हजार रुपये आणि अर्जाच्या खर्चापोटी ५ हजार रुपये प्रतिवादींना देण्याचाही आदेश दिला.
कामाच्या वेळेत हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू पावलेले साहेबराव सरोदे यांची पत्नी कमलबाई, मुलगा सचिन व मुलगी अश्विनी यांनी ट्रकमालक सुरेश राजपूत व युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लि.विरुद्ध कामगार नुकसान भरपाई कायद्याअंतर्गत ॲड. संदीप बी. राजेभोसले यांच्यामार्फत सादर केलेल्या अर्जाच्या सुनावणीअंती कामगार न्यायालयाने हा आदेश दिला. साहेबराव हे ट्रकमालक राजपूत यांच्या ट्रकवर चालक होते. त्यांना दरमहा १० हजार रुपये पगार होता. त्यांना रात्रंदिवस सलग १५ तास ट्रक चालवावा लागत होता. कामाच्या ताणामुळे त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन त्यांचा मृत्यू झाला, असा त्यांच्या वारसांचा दावा होता.
सरोदे यांचा मृत्यू नैसर्गिक असून तो अपघाती नाही; त्यामुळे अर्जदार नुकसान भरपाईसाठी पात्र नाहीत. ट्रकची विमा पॉलिसी अपघातासाठी देण्यात आलेली असून, ती नैसर्गिक मृत्यूसाठी लागू होत नाही, असा विमा कंपनीचा बचाव होता. ॲड. संदीप राजेभोसले यांना ॲड. सुधीर घोंगडे, ॲड. वासुदेव कुलकर्णी, ॲड. दिनेश चव्हाण, ॲड. समृद्धी देशमुख-भैरव आणि प्रशांत गायकवाड यांनी सहकार्य केले.