तोल जाऊन चिमुकली पडली हिटर लावलेल्या बादलीत; झाला हृदयद्रावक अंत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2022 07:19 PM2022-11-25T19:19:42+5:302022-11-25T19:19:54+5:30
चिमुकली हात धुण्यासाठी नळावर गेली होती. तेथे तोल गेल्याने ती हीटर लावलेल्या बादलीत पडली.
वाळूज महानगर (औरंगाबाद) : घरातील जिन्याखाली असलेल्या नळावर हात धुताना तोल जाऊन हीटर लावलेल्या बादलीत पडल्याने, गंभीर भाजलेल्या ४ वर्षांच्या चिमुकलीचा शुक्रवारी (दि. २५) सकाळी सातच्या सुमारास शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. श्रेया राजेश शिंदे (४, रा.साईनगर, कमळापूर) असे मृत चिमुकलीचे नाव आहे.
राजेश शिंदे हे पत्नी सीमा, मुलगा साई (७), मुलगी श्रेया (४), आई-वडिलांसह कमळापूर येथे साईनगरात वास्तव्यास आहेत. बुधवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास राजेश शिंदे हे कामावरून घरी परतल्यानंतर, त्यांनी अंघोळ करण्यासाठी जिन्याखाली बादलीत पाणी गरम करण्यासाठी हीटर लावले होते. यानंतर, त्यांनी चिमुकली श्रेया हिला सोबत घेऊन जेवण केले. जेवण झाल्यानंतर श्रेया ही हात धुण्यासाठी जिन्याखाली असलेल्या नळावर गेली होती. तेथे तोल गेल्याने ती हीटर लावलेल्या बादलीत पडली. तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकून वडील राजेश घराबाहेर आले. त्यावेळी त्यांना श्रेया हीटर लावलेल्या बादलीत पडल्याचे दिसून आले. त्यांनी तिला बादलीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता, विजेचा शॉक लागून ते दूर फेकले गेल्या. यानंतर, त्यांनी हीटरचे बटण बंद करून तिला बादलीतून बाहेर काढले.
श्रेया हिला गंभीर भाजलेल्या अवस्थेत उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना, शुक्रवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास तिची प्राणज्योत मालवली. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास हेड कॉन्स्टेबल कारभारी गाडेकर हे करीत आहेत.