बाहेर हॉटेल-लॉजिंगचा पाटी, आत कल्चरल क्लबच्या नावाखाली जुगाराचा अड्डा; ४० जण ताब्यात
By सुमित डोळे | Published: November 30, 2023 02:55 PM2023-11-30T14:55:21+5:302023-11-30T15:00:01+5:30
निवडक कर्मचाऱ्यांसह पोलिस उपायुक्तांचा क्लबवर छापा
छत्रपती संभाजीनगर : बाहेर हॉटेल, लॉजिंगचा बोर्ड लावून आत सोशल, कल्चरल क्लबच्या नावाखाली सुरू असलेल्या मोठा पत्त्याच्या क्लब सोमवारी पोलिसांनी उद्ध्वस्त केला. गेल्या आठ दिवसांपासून फ्रंट फूटवर येऊन कारवायांचा धडाका लावलेल्या पोलिस उपायुक्त नितीन बगाटे यांनी निवडक कर्मचाऱ्यांसह सायंकाळी छापा मारला. राम बोडखे नामक इसम क्लब चालवत होता. त्याच्यासह व्यवस्थापक व ४० जुगाऱ्यांना ताब्यात घेण्यात आल्याचे क्रांती चौक पोलिस ठाण्याचे निरीक्षक संतोष पाटील यांनी सांगितले.
८ दिवसांपासून उपायुक्त बगाटे यांनी परिमंडळ १ मधील अवैध व्यवसायांविरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. मध्यवर्ती बसस्थानकासमोरील भोईवाड्यात एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर अनेक महिन्यांपासून बोडखे खुलेआम क्लब चालवत असल्याची माहिती त्यांना मिळाली. निवडक कर्मचाऱ्यांसह त्यांनी सायंकाळी धाड टाकली. जुगाऱ्यांचे डाव रंगलेले असतानाच पोलिस आल्याने त्यांची धांदल उडाली. क्रांती चौक पाेलिस ठाण्याचे निरीक्षक संतोष पाटील, उपनिरीक्षक विकास खटके, अंमलदार इरफान खान, संतोष मुदिराज यांनी बोडखेसह अन्य आरोपींना ताब्यात घेतले. ४० जुगाऱ्यांकडून लाखो रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत आरोपींची नावे घेण्याची प्रक्रिया, रोख रकमेची मोजदाद सुरू होती.
अशीही पळवाट, ‘कॉईन’चा वापर
तळमजल्यावर गादीघर व पहिल्या मजल्यावर सुरू असलेल्या पत्त्यांच्या क्लबला बोडखेने कल्चरल सेंटरचे स्वरूप दिले होते. करमणूक कराच्या नावाखाली हे क्लब चालवले जातात. त्या बोर्डवर कन्नड कल्चरल सेंटर, त्याचा शासकीय नोंदणी क्रमांक, सोशल क्लब, कार्ड रूम रम्मी (सभासदांसाठी) असे नमूद करून मुंबई उच्च न्यायालयाची ऑर्डर असा उल्लेख आहे. रोख रकमेऐवजी येथे कॉईनच्या वापराला प्राधान्य दिले जाते. तरीही जवळपास ३ लाखांची रोकड येथे सापडली. यापूर्वीही शहरात काही राजकीय पुढाऱ्यांनी सोशल क्लब, कल्चरल क्लबचा आधार घेत असे क्लब सुरू केले होते.