Crocodile :जायकवाडी धरणात मृतावस्थेत आढळली 7 फूट लांबीची महाकाय मगर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2022 11:43 AM2022-02-02T11:43:42+5:302022-02-02T11:50:53+5:30
जायकवाडी धरणाच्या नाथसागरात २००६ नंतर ठराविक कालावधीनंतर मगरीचे दर्शन होऊ लागले आहे.
पैठण :जायकवाडी धरणात मंगळवारी सायंकाळी मृत अवस्थेत सात फूट लांबीची महाकाय मगर आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. वन्यजीव विभागाच्या वतीने मगरीचा देह पाण्याबाहेर काढून कार्यालयात हलविण्यात आला. शवविच्छेदनानंतर मगरीच्या मृत्यू कशामुळे झाला हे स्पष्ट होईल, असे वनपरिक्षेत्र अधिकारी राजश्री बांगर यांनी सांगीतले.
जायकवाडी धरणाच्या नाथसागरात २००६ नंतर ठराविक कालावधीनंतर मगरीचे दर्शन होऊ लागले आहे. मंगळवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास जायकवाडी धरणाच्या कऱ्हेटाकळी परिसरातील बॅकवाटर क्षेत्रात पाण्याच्या कडेला सात फूट लांबीची मगर परिसरातील नागरिकांना आढळून आली. मगर पाण्यात पहुडलेली असावी, असे गृहीत धरून नागरिकांनी सुरुवातीला दुर्लक्ष केले. परंतु लाटेसोबत मगर किनाऱ्याकडे सरकत असल्याचे लक्षात आहे. मगर कुठलीही हालचाल करत नसल्याने शुभम चौतमल या तरुणाने मगरीच्या जवळ जाऊन निरीक्षण केले. तेव्हा मगरीचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले.
शुभमने पैठणच्या वन्यजीव विभागास फोनवरून माहिती दिली. वनपरिक्षेत्र अधिकारी राजश्री बांगर यांनी सहायक वनसंरक्षक डॉ. राजेंद्र लाळे यांना कल्पना देऊन तातडीने घटनास्थळी जाऊन मगरीची पाहणी केली. मगर मरण पावलेली असल्याने वनपरिमंडळ अधिकारी रूपाली सोळसे, वनरक्षक राहुल नरवडे, रामेश्वर बोडखे, कल्याण राठोड, प्राणीमित्र शुभम चौतमल व स्थानिक नागरिक व वन्यजीव विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मगरीचा मृतदेह पाण्याबाहेर काढून तो पैठण येथील वन्यजीव विभागाच्या कार्यालयात हलविला आहे.
आज होणार शवविच्छेदन
पैठण येथील पशुचिकित्सालय रुग्णालयात मगरीचे शवविच्छेदन बुधवारी करण्यात येणार आहे. जलसाठ्यात मगर मरण पावल्याची पहिलीच घटना आहे. मगरीचा मृत्यू कशामुळे झाला असावा हे उद्याच्या तपासणीत स्पष्ट होईल.