दोन पिढ्यांपासून संबंध असलेल्या मजुरावर चोरीचा संशय; मालकाने मध्यरात्री शेतातच केली हत्या
By सुमित डोळे | Published: December 14, 2023 06:47 PM2023-12-14T18:47:45+5:302023-12-14T18:48:33+5:30
बेदम मारहाण करून त्याच्या जवळच झोपला, सकाळी उठल्यावर खून झाल्याचे आले लक्षात
छत्रपती संभाजीनगर : अनेक वर्षांपासून त्याच्याकडेच काम करणाऱ्या मजुराला शेतात पाणी देण्यासाठी मालकाने शेतात नेले. मध्यरात्री त्याच्यावर चोरीचा आळ घेत डोके, चेहऱ्यावर बेदम मारहाण करून त्यांची हत्या केली. शेख नब्बी शेख अब्दुल शेख (५४) असे मृताचे, तर गणेश गोपीनाथ बकाल (५०, दोघे रा. चिकलठाणा) आरोपीचे नाव आहे. बुधवारी मध्यरात्री २:३० वाजता जुन्या बीड बायपास परिसरात ही घटना घडली.
बकाल व शेख नब्बी या दोन कुटुंबांचे दोन पिढ्यांपासून संबंध होते. गरज पडेल तेव्हा नब्बी बकालच्या शेतात कामाला जात होते. १२ डिसेंबर रोजी सकाळी शेख नब्बी पत्नीसह घरीच होते. ९ वाजता गणेश बकाल व त्याचा मुलगा आकाश दोघे त्यांच्या घरी गेले. शेतात पाणी भरण्यासाठी व नांगरणी करण्यासाठी त्यांना घेऊन जात आहे, असे त्यांच्या पत्नीला सांगितले. पत्नीने त्याला विरोधही केला. मात्र, बकालने ऐकले नाही. बुधवारी सकाळी ९ वाजले तरी शेख नब्बी परतले नव्हते. पत्नी, दोन मुले चिंतेत होते. आसपास कुजबुज सुरू झाली. नब्बी यांच्या मुलाने अंदाज घेतला तेव्हा वडिलांना घाटीत नेल्याचे कळले. त्यांनी घाटीत धाव घेतली तेव्हा वडिलांना मृतावस्थेत पाहून धक्काच बसला. नब्बी यांच्या हात, पाय, पाठीवर जखमा होत्या.
सकाळपर्यंत तेथेच झोपला
बकालने नब्बी यांच्यावर शेती अवजारे चोरीचा आळ घेतला होता. त्यातून त्यांच्यात वाद झाले. बकालने दारू पिऊन नब्बी यांना काठीने मारहाण केली. त्यात नब्बी गप्पगार झाला. नब्बी झोपला असेल असे समजून तोही तेथेच झोपला. मात्र, सकाळी जाग आल्यावर उठवायला गेल्यावर मृत्यू झाल्याचे कळाले.
घटनेची माहिती कळताच निरीक्षक गौतम पातारे, उपनिरीक्षक आत्माराम घुगे, राधा लाटे यांनी धाव घेतली. शवविच्छेदनानंतर आरोपीच्या अटकेसाठी नब्बी यांच्या कुटुंबाने मृतदेह ठाण्यात नेला. घुगे हेड कॉन्स्टेबल प्रकाश सोनवणे, संतोष सोनवणे, देवीदास काळे, अरविंद पुरी, मानसिंग मेहेर हे तातडीने रवाना होत पळून जाण्याआधी बकालच्या मुसक्या आवळून ठाण्यात नेले. त्यानंतर पातारे यांनी कुटुंबाची समजूत घातल्यानंतर ते मृतदेह घेऊन निघून गेले.