हाताला काम तर नाही मिळाले जीव गेला; कामाच्या शोधार्थ निघालेल्या मजुराला कंटेनरने चिरडले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2023 05:03 PM2023-05-04T17:03:02+5:302023-05-04T17:04:03+5:30

कंटेनरच्या धडकेत महावीर चौकात एकाचा मृत्यू

A laborer who was out of the house in search of work was crushed by an overrunning container in Paithan | हाताला काम तर नाही मिळाले जीव गेला; कामाच्या शोधार्थ निघालेल्या मजुराला कंटेनरने चिरडले

हाताला काम तर नाही मिळाले जीव गेला; कामाच्या शोधार्थ निघालेल्या मजुराला कंटेनरने चिरडले

googlenewsNext

पैठण : पैठण-शेवगाव रोडवरील महावीर चौक परिसरात भरधाव कंटेनरने धडक दिल्याने शेतमजूराचा जागीच मृत्यू झाला आहे. गुरुवारी दुपारी एक वाजेच्या दरम्यान हा अपघात घडला. भाऊसाहेब चोरमले (५२) रा. चांगतपुरी ता. पैठण असे अपघातात मरण पावलेल्या शेतमजुराचे नाव आहे. 

कामधंदा शोधण्यासाठी भाऊसाहेब चोरमले गुरूवारी पैठण शहरात आले होते ; परंतु दुर्दैवाने कामधंदा मिळण्या अगोदरच त्यांना काळाने गाठले.  पैठण शेवगाव रोडवर महावीर चौकातील टी पॉंईट लगत दुपारी एक वाजेच्या दरम्यान छत्रपती संभाजी नगर कडून शेवगावकडे भरधाव कंटेनर जात होता. अचानक आखतवाडा कच्च्या रस्त्यावरून मोटारसायकल पैठण-शेवगाव रोडवर  दाखल झाली, मोटारसायकलला वाचविण्याच्या प्रयत्नात कंटेनर चालकाने कंटेनर आडवा वळवला, मोटारसायकल स्वार वाचला ; परंतु रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने पायी जात असलेल्या भाऊसाहेब चोरमले यांना कंटेनरचा जोरदार धक्का बसला व ते रस्त्यावर कोसळले.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक दशरथ बुरकुल, सुधीर वाव्हळ, मुकुंद नाईक, भगवान धांडे, लक्ष्मण पुरी आदींनी भाऊसाहेब चोरमले यांना येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.डॉक्टरांनी तपासून चोरमले यांना मृत घोषित केले. दरम्यान, रस्त्यावर कंटेनर आडवा झाल्याने पैठण शेवगाव रोडवर बऱ्याच वेळासाठी वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी रस्त्यावर आडवा झालेला कंटेनर बाजूला करून वाहतूक मोकळी केली. कंटेनरची ट्रॉली सोडून ट्रक पोलिसांनी ठाण्यात  नेला. अपघातानंतर कंटेनर चालक पळून गेला. अपघाताची नोंद पोलीस ठाण्यात घेण्यात आली आहे. 

अपघातात मरण पावलेले भाऊसाहेब चोरमले हे अत्यंत धार्मिक वृत्तीचे होते. स्वाध्याय परिवाराचे सदस्य होते. गावातील मारोती मंदिराची नित्यनेमाने ते झाडझूड करायचे. मनमिळाऊ व कष्टाळू असलेल्या भाऊसाहेब चोरमले यांच्या अपघाती मृत्यूची खबर चांगतपुरी येथे पोहचताच मोठ्या संख्येने गावकऱ्यांनी पैठण येथील शासकीय रुग्णालयात धाव घेतली. भाऊसाहेब चोरमले यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व एक मुलगी आहे. अपघात होण्या अगोदर भाऊसाहेब चोरमले यांनी गावातील मोटारसायकलवर आलेल्या तरूणांना परत जाताना मला येऊ द्या असे सांगितले. परंतु, त्यांना वेळ असल्याने गावाकडे जाणारी मोटारसायकल महावीर चौकात मिळेल म्हणून भाऊसाहेब चोरमले तेथे पायी जात होते. मध्येच कंटेनरच्या रूपात काळाने त्यांना गाठले.

Web Title: A laborer who was out of the house in search of work was crushed by an overrunning container in Paithan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.