दोन लाखांचे कर्ज; वर्षाला पाच टक्के व्याज; पिढीजात व्यावसायिकांना पीएम विश्वकर्मा योजना वरदान
By प्रशांत तेलवाडकर | Published: October 27, 2023 12:58 PM2023-10-27T12:58:36+5:302023-10-27T12:59:01+5:30
पीएम विश्वकर्मा योजनेसाठी कारागिरांना करावी लागणार प्रतीक्षा
छत्रपती संभाजीनगर : देशात असे कोट्यवधी कारागीर आहेत जे आपला खानदानी व्यवसाय तेवढ्याच नेटाने करत आहेत. त्यांच्याकडे पारंपरिक कौशल्य आहे, त्या व्यवसायाला लागणारे साहित्य खरेदीसाठी मुबलक रक्कम नाही. अशा कारागिरांसाठी केंद्र सरकारने ‘पंतप्रधान विश्वकर्मा योजना’ सुरू केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खानदानी कारागिरांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण, योजनेसाठी पहिल्या टप्प्यात आपल्या जिल्ह्याचा समावेश करण्यात आला नाही.
काय आहे पी.एम.विश्वकर्मा योजना?
ज्यांचे खानदानी व्यवसाय आहेत. जसे लोहार, सोनार, कुंभार, सुतार, मोची अशा १८ पारंपरिक व्यवसायांचा समावेश पी.एम. विश्वकर्मा योजनात समावेश होतो. यात केवळ कर्जच नाही तर कौशल्य प्रशिक्षणही मिळणार आहे. प्रशिक्षण कालावधीत स्टायपेंडही देण्यात येणार आहे.
व्याजदर कमी
कर्ज मंजूर होण्याआधी खानदानी कारागिरांना ७ दिवसांचे कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यानंतर साहित्य खरेदीसाठी पहिल्या टप्प्यात १ लाख रुपयांचे कर्ज दिले जाणार आहे. ते कर्ज परतफेड केले की, लगेच २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देण्यात येईल. विशेष म्हणजे वर्षाला ५ टक्के व्याजदर आकारला जाईल.
कोणाला मिळते कर्ज
१) १८ पारंपरिक व्यवसायातील खानदानी कारागिर या योजनेचा फायदा घेऊ शकतात.
२) लाभार्थीचे वय १८ वर्षापेक्षा जास्त आणि ५० वर्षांपेक्षा कमी असावे.
३) मान्यताप्राप्त संस्थेचे संबधित ट्रेडचे प्रमाणपत्र असावे.
कागदपत्रे काय लागतात ?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, ओळखपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, बँक पासबुक आणि मोबाइल नंबर असणे गरजेचे आहे.
ऑनलाइन अर्ज कसा कराल ?
अधिकृत बेवसाइट pmvishwakarma.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज भरावा लागणार आहे.
पिढीजात कारागिरांना सुवर्णसंधी
पीएम विश्वकर्मा योजना पिढीजात व्यवसाय करणाऱ्या कारागिरांसाठी व्यवसायवाढीसाठी सुवर्णसंधी आहे. मात्र, पहिल्या टप्प्यात छत्रपती संभाजीनगरसह आणखी ७ जिल्ह्यांचा समावेश नाही. मात्र, पुढील टप्प्यात समावेश होऊ शकतो. तेव्हा जिल्ह्यातील कारागिरांना या योजनेचा लाभ घेता येईल.
-मंगेश केदार, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक