मजुराच्या पोराने बनविली चुंबकीय बलावर धावणारी रेल्वे; बुलेट ट्रेनला ठरेल पर्याय
By विजय सरवदे | Published: March 27, 2023 03:46 PM2023-03-27T15:46:17+5:302023-03-27T15:47:18+5:30
चार वर्षांपूर्वी डॉ. रावजी शिंदे यांनी आपल्या सहकारी शास्त्रज्ञांसोबत चुंबकीय रेल्वेचे प्रारूप (मॉडेल) तयार केले.
छत्रपती संभाजीनगर : ग्रामीण भागात लहानाचा मोठा झालेल्या एका तरुणाने आपल्या अथक बुद्धीच्या बळावर देशातील पहिली इंधन विरहित रेल्वे तयार केली. ही रेल्वे चुंबकीय बलावर ताशी ६०० किमी वेगाने धावू शकते, शिवाय ती बुलेट ट्रेनलाही पर्याय ठरेल. पुढील महिन्यात चेन्नई येथील आयआयटीमध्ये या रेल्वेच्या मॉडेलचे परीक्षण केले जाणार आहे. थोर शास्त्रज्ञ डॉ. रावजी शिंदे यांनी तयार केलेली ही रेल्वे भविष्यात परिवहन क्षेत्रामध्ये क्रांती करणारी ठरेल.
संगमनेर तालुक्यातील मनोलीचे रहिवासी डॉ. रावजी शिंदे यांनी माजी राष्ट्रपती ‘मिसाईल मॅन’ डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या टीममध्ये आठ वर्षे काम केले. ते नुकतेच ‘एमजीएम’मध्ये एका राष्ट्रीय चर्चासत्रासाठी आले होते. त्यावेळी ‘लोकमत’ला त्यांनी या चुंबकीय रेल्वेच्या (मॅग्लेव्ह) संशोधनाचा इतिहास तसेच डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्यासोबत संरक्षण क्षेत्रात केलेल्या कार्याची माहिती कथन केला.
डॉ. शिंदे हे कानपूर येथील आयआयटीचे सुवर्णपदक विजेते आहेत. त्यांनी स्वदेशी चुंबकीय तंत्रज्ञान विकसित केले असून भारत सरकारने त्यांना ‘उत्कृष्ट वैज्ञानिक’ पुरस्काराने सन्मानित केले आहे. असे असले तरी त्यांचे लहानपण अत्यंत खडतर परिस्थितीत गेले आहे. इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीची पदवी घेतल्यानतर ‘गेट’ परीक्षेत देशात पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याचे त्यांना ठाऊकही नव्हते. त्यावेळी ते आईला मदत म्हणून खदानीत दगड फोडण्याचे काम करायचे. कानपूर येथे आयआयटीची पदवी घेतल्यानंतर ते डॉ. शिंदे सांगतात, जपानमध्ये उच्चशिक्षणासाठी गेलो. तेथेच पीएच.डी.ची पदवी संपादन केली. डॉ. एपीजे अब्दुल कलाम कार्यक्रमासाठी जपानला आले आणि भारतीय विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली. तेव्हा भारतात आयआयटी करून आपले विद्यार्थी पदवीचा उपयोग विदेशासाठी करतात. देशाला तुमची गरज आहे. तुम्ही परत चला, अशी त्यांनी साद दिली आणि मी त्यांच्यासोबत भारतात परत आलो. ‘संरक्षण संशोधन आणि विकास संस्थे’त त्यांच्या टीममध्ये बरेच वर्षे काम केले.
भारत तिसरा देश ठरेल
अलीकडे चार वर्षांपूर्वी डॉ. शिंदे यांनी आपल्या सहकारी शास्त्रज्ञांसोबत चुंबकीय रेल्वेचे प्रारूप (मॉडेल) तयार केले. ही रेल्वे चालविण्यासाठी द्रवरूप नायट्रोजन चुंबकीय शक्तीच्या रुळांचा वापर केला जातो. रेल्वेच्या प्रारूपाची प्रात्यक्षिके यशस्वी झाल्यानंतर त्यासंबंधी भारत सरकारसोबत चर्चा झाली. मात्र, कोरोना काळात दोन वर्षे गेली. आता चेन्नई येथील आयआयटीतील रेल्वे विभागाने या रेल्वेच्या परीक्षणासाठी निमंत्रण दिले आहे. ही रेल्वे प्रत्यक्षात उतरल्यास चुंबकीय रेल्वेसाठी जपान आणि चीननंतर भारत देश जगात तिसरा ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.