बिडकीनजवळ मुख्य जलवाहिनी फुटली, जुन्या शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत
By मुजीब देवणीकर | Published: September 14, 2022 05:34 PM2022-09-14T17:34:45+5:302022-09-14T17:35:05+5:30
. पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी आणखी दोन दिवस लागण्याची शक्यता आहे.
औरंगाबाद: शहराला पाणीपुरवठा करणारी जुनी जलवाहिनी पैठण रोडवरील बिडकीनजवळ मध्यरात्री फुटली. महापालिकेकडून त्वरित दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र, यामुळे शहर पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे.
औरंगाबादमध्ये एकीकडे नवीन जलवाहिनीचे काम सुरु आहे तर दुसरीकडे जुन्या जलवाहिनीला गळती देखील नियमित आहे. आयुमर्यादा संपलेल्या या जलवाहिनीवर सध्या शहराचा पाणीपुरवठा सुरु आहे. काल मध्यरात्री पैठण रोडवरील बिडकीनजवळ मुख्य जलवाहिनी फुटली. जलवाहिनी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. या कामामुळे जुन्या शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी आणखी दोन दिवस लागण्याची शक्यता आहे.
चिखलामुळे दुरुस्तीत व्यत्यय
बिडकीन जवळ एका शेतातून गेलेली जलवाहिनी फुटली आहे. त्या ठिकाणी आजूबाजुला शेती आहे. तसेच सातत्याने झालेल्या पावसाने सर्वत्र काळ्या मातीचा चिखल आहे. दुरुस्तीच्या कामासाठी जाणारी जेसीबी चिखलात फसत होती. गळतीच्या ठिकाणापर्यंत पोचण्यासाठी डांबरी रोड पासून साधारण १० ते १५ मीटर अंतरावर मुरूम टाकून रॅम बनवावा लागला. त्यानंतर जेसीबी तिथे पोहाचली.
अनधिकृत नळ कापण्याची मोहीम तीव्र
दरम्यान, शहरात तब्बल दीड लाखावर नळ कनेक्शन अनधिकृत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकारावर खंडपीठाने यापूर्वीच तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. खंडपीठाच्या आदेशानंतर महापालिकेने अनधिकृत नळ कनेक्शन खंडित करण्याची माेहीम अधिक तीव्र केली. मंगळवारी पीरबाजार चौकातील १०८ अनधिकृत नळ कनेक्शन कापण्यात आले. विशेष बाब म्हणजे एकच ठिकाणी तब्बल ५४ जोडण्या होत्या. अनेक नागरिकांनी पाणी जास्त यावे म्हणून १ आणि २ इंची नळ कनेक्शन घेतले होते. ही कारवाई मुख्य लेखाधिकारी संतोष वाहुळे यांच्या नेतृत्वाखाली क्रमांक एकच्या पथकाने केली.