निवडणूक आयोगाची मोठी कारवाई; ३३ शाळांच्या मुख्याध्यापकांचे निलंबन करण्याचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2024 03:25 PM2024-11-18T15:25:43+5:302024-11-18T15:26:31+5:30
जिल्ह्यातील ९२ शाळांनी आपल्या कर्मचाऱ्यांची माहिती निवडणूक विभागाला सादर केली नव्हती.
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील ३३ खासगी शाळांच्या मुख्याध्यापकांवर शिक्षण विभागाने गुन्हे दाखल केले. आता त्या मुख्याध्यापकांना निलंबित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत. जिल्ह्यातील ९२ शाळांनी आपल्या कर्मचाऱ्यांची माहिती निवडणूक विभागाला सादर केली नव्हती. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी त्या शाळांच्या मुख्याध्यापकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार आतापर्यंत ३३ शाळांच्या मुख्याध्यापकांवर गुन्हे दाखल झाले. यात प्राथमिक १७ आणि माध्यमिकच्या १६ शाळांचा समावेश आहे. उर्वरित विनाअनुदानित शाळांची माहिती चुकून डेटामध्ये आल्याची माहिती शिक्षण विभागाने जिल्हा प्रशासनाला दिली.
विधानसभा निवडणूक कामकाजासाठी खूप कर्मचारी लागतात. त्यामुळे विविध सरकारी कार्यालये, अनुदानित खासगी शाळा, अनुदानित खासगी महाविद्यालयांमधील कर्मचाऱ्यांच्या सेवा निवडणूक विभागाकडे वर्ग करण्यात येतात. त्यानुसार विभागांकडून शैक्षणिक संस्थेतील कर्मचाऱ्यांची माहिती मागविली होती. परंतु, ती माहिती प्रशासनाला ३३ शाळांकडून मिळाली नाही.
...तर शाळांचे अनुदान बंदची शिफारस
निवडणूक कामासाठी कर्मचाऱ्यांची माहिती न देणाऱ्या सर्व शाळा खासगी आहेत. त्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाच्या कारवाईचे अधिकार संस्थाचालकांना आहेत. त्यामुळे ३३ शाळांच्या मुख्याध्यापकांना निलंबित करण्याबाबत शिक्षण विभागाकडून संस्थाचालकांना सूचना देण्यात येणार आहेत. संस्थाचालकांनी तशी कार्यवाही केली नाही तर त्या शाळेचे अनुदान बंद करण्याची शिफारस शिक्षण सचिवांकडे केली जाईल, असेही जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले.