मोठा अनर्थ टळला; डिझेल पाईप टाकीतच अन् बस पुढे गेली; क्षणात पंप उखडला
By संतोष हिरेमठ | Published: April 8, 2023 11:38 PM2023-04-08T23:38:37+5:302023-04-08T23:39:35+5:30
मध्यवर्ती बस स्थानकातील घटना : सुदैवाने मोठी दुर्घटना टळली
छत्रपती संभाजीनगर : डिझेल पाईप टाकीत असतानाच अचानक एसटी पुढे गेली आणि संपूर्ण पंपच उघडून गेल्याची धक्कादायक घटना शनिवारी सायंकाळी मध्यवर्ती बसस्थानकात घडली. सुदैवाने कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही. याप्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचे एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
मध्यवर्ती बसस्थानकातील डिझेल पंपावर सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास एका शिवशाही बसमध्ये इंधन भरण्यात येत होते. इंधन भरून झाल्यानंतर पाईप टाकीत होता आणि अशा अवस्थेत चालकाने बस पुढे नेली. कोणाला काही कळण्याच्या आतच डिझेल पंप उखडून लगेला. या प्रकाराने एकच भीतीचे वातावरण निर्माण झाले.मात्र, सुदैवाने यावेळी कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही. आजूबाजूच्या कर्मचाऱ्यांनी वेळीच धाव घेऊन बसला रोखले.
मध्यवर्ती बस स्थानकाचे आगार व्यवस्थापक अविनाश साखरे म्हणाले, याप्रकरणी नेमकी कोणाची चूक आहे, याची चौकशी करून पुढील कारवाई केली जाणार आहे. आगामी दोन ते तीन दिवसात डिझेल पंपाची दुरुस्ती होईल.
काय होता धोका ?
अशा प्रकारे डिझेल पंप उखडल्यावर स्फोट होण्याची, आग भडकण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु मध्यवर्ती बसस्थानकात असा कोणताही प्रकार घडला नाही.