एका गोळीने टळू शकतो गर्भवती महिला आणि बाळावरील मोठा धोका
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 15:33 IST2025-02-04T15:32:36+5:302025-02-04T15:33:23+5:30
फॉलिक ॲसिड हे शरीरात अनेक महत्त्वाच्या कार्यांसाठी आवश्यक आहे.

एका गोळीने टळू शकतो गर्भवती महिला आणि बाळावरील मोठा धोका
छत्रपती संभाजीनगर : कल्पना करा, तुमच्या आयुष्याचा सगळ्यात आनंदाचा क्षण म्हणजे बाळाचा जन्म आणि त्याच क्षणी डॉक्टर सांगतात की, नवजात बाळाची शस्त्रक्रिया करावी लागेल. हृदयाचा ठोका चुकतो ना? पण हे टाळता आले तर? खरे सांगायचे तर, फक्त एका छोट्याशा फॉलिक ॲसिडच्या गोळीने हा मोठा त्रास टाळू शकताे. होय, हेच सत्य आहे.
फॉलिक ॲसिड हे शरीरात अनेक महत्त्वाच्या कार्यांसाठी आवश्यक आहे. हे केवळ जन्मजात विसंगती टाळण्यासाठीच नव्हे, तर शरीरातील रक्तनिर्मितीसाठी आणि विशेषतः ॲनिमिया टाळण्यासाठीही उपयुक्त ठरते. कित्येक जन्मत: दोष केवळ आईने फॉलिक ॲसिड घेतले, तर टळतात. पण, ही गोळी पाळी चुकल्यावर घेऊन काहीच फायदा नाही, कारण तोपर्यंत होणाऱ्या बाळाचा डीएनए फिक्स झालेला असतो. म्हणून, गर्भधारणेपूर्वी तीन महिने फॉलिक ॲसिड सुरू करणे योग्य ठरते. नंतर पूर्ण नऊ महिने फॉलिक ॲसिड घ्यावे. यातूनच बरेच बर्थ डिफेक्टस् ८५ टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतात किंवा आजाराचे स्वरूप सौम्य होऊ शकतो, असे तज्ज्ञ म्हणाले.
१,५६१ ॲनिमियाग्रस्त महिलांची प्रसूती
घाटीत २०२४ मध्ये ॲनिमियाग्रस्त १ हजार ५६१ महिलांची प्रसूती झाली.
१८० दिवस गोळ्या
गरोदर महिलांना आरोग्य विभागाकडून गरोदरपणात १८० दिवस आणि प्रसूती झाल्यानंतर १८० दिवस फाॅलिक ॲसिडच्या गोळ्या दिल्या जातात.
चहाला फॉलिक ॲसिडयुक्त करावे
परदेशात नवविवाहित जोडप्यांना फाॅलिक ॲसिड गिफ्ट दिले जाते. मोठ्या सामूहिक विवाहाच्या आयोजनात जर आम्हास बोलावले, तर आम्ही नवविवाहित पती, पत्नी यांना सखोल माहिती देऊ व सामाजिक जबाबदारीला मदत होईल. पिण्याच्या चहाला जर आपण फॉलिक ॲसिडयुक्त केले, तर असे वाटते की बरेच बर्थ डिफेक्ट्स नियंत्रणात आणू शकू.
- डॉ. आर. जे. तोतला, वरिष्ठ, पेडियाट्रिक सर्जन व पेडियाट्रिक युरोलॉजिस्ट
महत्त्वपूर्ण गोळ्या
आरोग्य विभागातर्फे गरोदर महिलांसह लहान मुले, मुलींना फाॅलिक ॲसिड आणि आयर्नच्या गोळ्यांचे वितरण केले जाते. महिलांचा रक्तक्षय कमी करण्यासाठी, प्रतिबंध करण्यासाठी आणि उपचारासाठी या गोळ्या महत्त्वाच्या आहेत.
- डाॅ. अभय धानोरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी