सत्तारांच्या सिल्लोडमध्ये दानवेंच्या विरोधात निघणार मोर्चा, देशद्रोहाचा गुन्हा नोंदविण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2024 07:26 PM2024-09-18T19:26:39+5:302024-09-18T19:27:57+5:30
अब्दुल सत्तार -रावसाहेब दानवे यांच्या मैत्रीत मिठाचा खडा; सिल्लोड शहर बंदची हाक; दानवे विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हे दाखल करन्यासाठी निघणार निषेध मोर्चा
सिल्लोड: भाजपचे माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी अजिंठा येथील आंदोलनात सिल्लोड
पाकिस्तान आहे की काय ? जनतेने रहावे की जावे ? असा सवाल करून येथील जनतेचा अपमान केला आहे. सिल्लोडचा वारंवार पाकिस्तान, असा उल्लेख केल्याने दानवेंच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी करत गुरुवारी शहर बंदची हाक देत निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे अब्दुल सत्तार व रावसाहेब दानवे यांच्या मैत्रीत मिठाचा खडा पडल्याचे दिसत आहे.
गुरुवारी दुपारी ११ वाजता सिल्लोड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून या मोर्चाला सुरुवात होणार असून तहसील कार्यालयपर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यानंतर उपजिल्हाधिकारी, व पोलीस अधीक्षक यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे.
आगामी विधानसभा निवडणुकी पूर्वी सिल्लोड शहर व तालुक्यातील वातावरण तापले आहे. एकेकाळी पक्के मित्र असलेले रावसाहेब दानवे व अब्दुल सत्तार यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. शिवना येथे गणेश महासंघाने आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमातील लावण्या भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी बंद पाडल्या. यामुळे तब्बल ३९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. याच्या निषेधार्थ रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वात रस्तारोको आंदोलन करण्यात आले. त्यानंतर आता गुरुवारी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या समर्थकांनी दानवे यांच्या विरोधात निषेध मोर्चाचे आयोजन केले आहे. यामुळे सत्तार- दानवेंचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होतांना दिसत आहेत. राज्यात युतीत सोबत असलेले भाजप - शिवसेना यांचे सिल्लोड मतदार संघात खटके उडतांना दिसत आहे.
या मोर्चामध्ये सिल्लोड - सोयगाव तालुक्यातील जनतेने सहभागी व्हावे असे आवाहन अर्जुन पाटील गाढे, केशवराव तायडे, श्रीराम महाजन, प्रभाकर काळे, मारुती वराडे,मुरलीधर काळे, राजूबाबा काळे, दामूअण्णा गव्हाणे, रामदास पालोदकर, नंदकिशोर सहारे, विश्वास दाभाडे, सतीष ताठे, सय्यद नासेर हुसेन, संदीप राऊत, गणेश सपकाळ यांनी केले आहे.या मोरच्यात मोठे शक्ती प्रदर्शन केले जाणार असल्याचे वृत्त आहे.