सततच्या त्रासाने उचलले टोकाचे पाऊल; विवाहित युवकाचा प्रेयसीच्या घरात आढळला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 01:16 PM2023-01-10T13:16:04+5:302023-01-10T13:22:25+5:30
गावातून येतो, असे पत्नीला सांगून घराबाहेर निघून गेला, तो परतलाच नाही.
सोयगाव : प्रेमसंबंध असलेल्या युवतीच्या त्रासाला कंटाळून तिच्याच घरी गळफास घेऊन एका ३३ वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची घटना ७ जानेवारी रोजी पळसखेडा येथे घडली. या प्रकरणी युवतीविरोधात सोमवारी फर्दापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पळसखेडा येथील भीमराव प्रकाश बोराडे हा युवक पळसखेडा येथून क्रुझर जीपने शाळेतील मुलांची ने-आण करीत असे. ७ जानेवारी रोजी त्याने पळसखेडा ते वाकोद येथील आठवडी बाजार असल्याने प्रवाशांची ने-आण केली. त्यानंतर तो संध्याकाळी बाजार करून घरी परतला व मला जेवण करायचे आहे, गावातून येतो, असे पत्नीला सांगून घराबाहेर निघून गेला, तो परतलाच नाही. रात्री त्याच्या वडिलांना एका व्यक्तीने तुमच्या मुलाने गावातील एका घरात गळफास घेतला आहे, असे सांगितले. त्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. फर्दापूर पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. पोलिस दाखल झाले.
पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने भीमराव बोराडे याला जामनेर येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले. येथे तपासणी करून त्यास डॉक्टरांनी मयत घोषित केले. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर ८ जानेवारी रोजी त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ९ जानेवारी रोजी या प्रकरणी मयत युवकाचे वडील प्रकाश शंकर बोराडे यांनी फर्दापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यात त्याच्या ३० वर्षीय प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून भीमराव बोराडे याने आत्महत्या केल्याचे नमूद केले आहे. त्यावरून त्या प्रेयसीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास फर्दापूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक देवीदास वाघमोडे करीत आहेत.