लाइक, कमेंट, शेअरचे चक्रव्यूह! सोशल मीडियासाठीच मोबाइलचा होतोय अधिक वापर

By सुमेध उघडे | Published: October 14, 2024 12:13 PM2024-10-14T12:13:52+5:302024-10-14T12:13:52+5:30

‘लोकमत’चे ऑनलाइन सर्वेक्षण : महिला शैक्षणिक आणि सोशल मीडिया या दोन्हींसाठी समान प्रमाणात मोबाइल वापरतात

A maze of likes, comments, shares! Mobile is being used more for social media only | लाइक, कमेंट, शेअरचे चक्रव्यूह! सोशल मीडियासाठीच मोबाइलचा होतोय अधिक वापर

लाइक, कमेंट, शेअरचे चक्रव्यूह! सोशल मीडियासाठीच मोबाइलचा होतोय अधिक वापर

छत्रपती संभाजीनगर : स्मार्ट मोबाइलचा वापर आता आधुनिक जीवनशैलीतील एक नैसर्गिक गरज बनली आहे. वायरलेस कॉलद्वारे कधीही आणि कुठेही एकमेकांच्या संपर्कात राहण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या मोबाइलवरइंटरनेटच्या आगमनाने क्रांती झाली. विविध बँकिंग, शैक्षणिक, मनोरंजन, सोशल मीडिया ॲपने मोबाइलची स्क्रीन व्यापून गेली आहे. यामुळे अनेकांच्या हातातून फक्त झोपताना मोबाइल वेगळा होतो, अशा घराघरांत तक्रारी वाढत आहेत. मोबाइलच्या वाढत्या वापराबाबत ‘लोकमत’ने एक ऑनलाइन सर्वेक्षण केले, तेव्हा सोशल मीडियासाठीच मोबाइल अधिक वापरला जातो, असा निष्कर्ष उत्तरदात्यांच्या माहितीतून निघाला.

भारत जगात दुसऱ्या क्रमांकाचा मोबाइल वापरकर्त्यांचा देश आहे. डिजिटल क्रांतीने मोबाइलवर अनेक शासकीय, खासगी कामे घरी बसून करता येतात. मात्र, मोबाइलचा वाढता वापर चिंतेचे कारण बनले असून याचा अनेकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतोय. मोबाइलधारक नेमका कशासाठी अधिक मोबाइल वापरतात हे जाणून घेण्यासाठी, तुम्ही सर्वांत जास्त मोबाइल कोणत्या कामासाठी वापरता? असा प्रश्न ‘लोकमत’कडून ऑनलाइन सर्वेक्षणात विचारण्यात आला. यात १२ वर्षे ते १८ वर्षे वयोगटातील १.२ टक्के, १९ वर्षे ते ३५ वर्षे- ३३.६ टक्के, ३६ वर्षे ते ५० वर्षे- ५१.९ टक्के, ५१ वर्षे ते पुढील वयोगटातील १३. ३ टक्के स्त्री-पुरुषांनी सहभाग घेतला. एकूण उत्तरदात्यांमध्ये ६ टक्के स्त्री आणि ९४ टक्के पुरुष आहेत.

सोशल मीडियासाठीच अधिक होतोय वापर
साधारणपणे प्रत्येक मोबाइलवर गजेनुसार अनेक ॲप असतात. मात्र, तब्बल ३५.३ टक्के उत्तरदात्यांनी सोशल मीडियासाठी मोबाइलचा अधिक वापर करत असल्याचे उत्तर दिले. तर त्याखालोखाल २७.८ टक्के उत्तरदात्यांनी कॉल, तर २२ टक्के उत्तरदात्यांनी शैक्षणिक कामासाठी अधिक मोबाइल वापरतो असे सांगितले. फोटो/व्हिडीओ काढण्यासाठी २.१ टक्के, यूट्यूब पाहणे- २.९ टक्के, बँकेची कामे करण्यासाठी ४.१ टक्के, तर मनोरंजनासाठी मोबाइलचा वापर अधिक होतो अशा ५.८ टक्के उत्तरदात्यांनी सांगितले. एकंदरीत यूट्यूब आणि मनोरंजन ॲप हे सोशल मीडियाचा भाग असल्याने ही टक्केवारी एकत्रित ४४ टक्के होते. यावरून मोबाइलचा सर्वांत जास्त वापर सोशल मीडियासाठी होत असल्याचा निष्कर्ष उत्तरदात्यांनी दिलेल्या माहितीवरून निघतो. विशेष म्हणजे, सर्वेक्षणात सहभागी महिलांनी शैक्षणिक आणि सोशल मीडिया या दोन्हींसाठी समान प्रमाणात मोबाइलचा वापर होतो, असे सांगितले.

तुम्ही सर्वांत जास्त मोबाइल कोणत्या कामासाठी वापरता?
कॉल : २७.८ टक्के
सोशल मीडिया - ३५.३ टक्के
फोटो/व्हिडीओ काढणे- २.१ टक्के
बँकिंग- ४.१ टक्के
यूट्यूब पाहणे- २.९ टक्के
शैक्षणिक- २२ टक्के
मनोरंजन- ५.८ टक्के

उत्तरदाते सुचवतात, तर इंटरनेट महाग करा, 
सर्वेक्षणात सहभागी उत्तरदात्यांनी काही सूचना देखील केल्या आहेत. त्या अशा :

- सर्वांनी मोबाइलचा स्क्रीन टाइम कमी कसा होईल हे पाहावे.
- २ जीबी इंटरनेट डेटा पॅकमुळे तरुण पिढी आळशी होत चालली आहे.
- मोबाइल कामापुरताच वापरणे योग्य.
- सोशल मीडियाचा वापर केवळ नवीन माहितीच्या देवाण-घेवाणीसाठी असावा.
- लहान मुलांच्या हातात मोबाइल देणे टाळावे.
- मोबाइलचा वापर कमी करण्यासाठी पुस्तक वाचण्याची सवय लावा.
- रात्री दहा ते बारा यावेळी इंटरनेट बंद असायला पाहिजे.
- नोकरी शोधण्यासाठी मोबाइलचा वापर करतो.
- इंटरनेट महाग झालं पाहिजे, मोबाइलचा वापर कमी होईल.
- शासनाने सर्व योजना, सुविधा मोबाइलवर द्याव्यात. यामुळे भ्रष्टाचार कमी होईल.

Web Title: A maze of likes, comments, shares! Mobile is being used more for social media only

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.