साखर, तेलाविनाच वाटाला ‘आनंदाचा शिधा’; अर्धवट पुरवठ्यामुळे प्रशासनाची तारेवरची कसरत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2022 12:14 PM2022-10-25T12:14:41+5:302022-10-25T12:15:17+5:30
दिवाळीच्या दिवसांपर्यंत कंत्राटदाराकडून जिल्ह्याला मागणीनुसार फूड किट मिळाल्या नाहीत.
औरंगाबाद : राज्य सरकारने दिवाळीनिमित्ताने रेशन दुकानातून रवा, साखर, हरभरा डाळ आणि पामतेल या चार वस्तूंचे किट ‘आनंदाचा शिधा’ उपक्रमातून गरिबांना देण्याचा निर्णय घेतला, पण या उपक्रमात किटमधील साहित्याचा पुरेशा प्रमाणात पुरवठाच केला नाही. त्यामुळे जिल्ह्यात काही ठिकाणी साखर, तेल यांच्याशिवायच हा शिधा वाटप करावा लागला. परिणामी शासनाच्या उद्देश्याला हरताळ फासला गेला. जिल्ह्यातील सर्व रेशन दुकानांपर्यंत किट वाटप करताना पुरवठा विभागाची प्रचंड दमछाक झाली.
दिवाळीच्या दिवसापर्यंत पुरवठा विभागाला रवा, हरभरा डाळ मागणीनुसार मिळाले. तेल, साखरेचा अर्धवट प्रमाणात पुरवठा झाला. अनेक दारिद्र्य रेषेखालील व प्राधान्य कुटुंब कार्डधारकांच्या पदरात ‘आनंदचा शिधा’ अर्धवटच पडला. प्रशासनाने तीन वस्तू असलेले किट प्रत्येकी ७५ रुपयांमध्ये वाटप केल्या. अनेक ठिकाणी तेल, साखरेविनाच शिधा वाटप झाले.
जिल्ह्यात ७ लाख ३३ हजार ५०२ रेशन कार्डधारक आहेत. त्यापैकी ५ लाख ५८ हजार कार्डधारक रेशन धान्यास पात्र आहेत. या सर्व कार्डधारकांना शासनाच्या घोषणेनुसार यंदा दिवाळीनिमित्त ‘आनंदाचा शिधा’ वितरित केला जाणार होता. शासनाने दिवाळी किट उपलब्ध करून देण्यासाठी कंत्राटदारही नियुक्त केला. जिल्हा पुरवठा विभागाने कंत्राटदाराकडे दुसऱ्याच दिवशी फूड पॅकेटची मागणी नोंदविली होती, परंतु दिवाळीच्या दिवसांपर्यंत कंत्राटदाराकडून जिल्ह्याला मागणीनुसार फूड किट मिळाल्या नाहीत. त्यामुळे पुरवठा विभागासह रेशन दुकानदारांना तारेवरची कसरत करावी लागली.
५०१ दुकानांवर दिल्या तीन वस्तू
जिल्ह्यात १८०१ रेशन दुकानांपैकी अंदाजे १३०० दुकानांवर दिवाळीचे फूड किट शंभर टक्के पुरवठा करण्यात प्रशासनाला यश आले. ३० टक्के रेशन दुकानांवर केवळ चारऐवजी तीन वस्तू उपलब्ध झाल्या. त्यामुळे ५०१ दुकानांशी संलग्न असलेल्या कार्डधारकांना ‘आनंदाचा शिधा’ उपक्रमातील पूर्ण किट दिवाळसणात मिळाले नाही.
जे उपलब्ध झाले ते दिले
अखेर जिल्हा पुरवठा विभागाने ज्या ठिकाणी तीन पॅकेट उपलब्ध आहेत, त्या दुकानदारांनी शंभरऐवजी ७५ रुपये घेऊन ते कार्डधारकांना वितरीत करावेत, असा निर्णय घेतला. तीन फुड पॅकेट का देताय, उर्वरित पॅकेट कुठे आहेत, असा सवाल उपस्थितीत करीत ग्राहकांनी दुकानदारांसोबत वाद घातल्याचे वृत्त आहे.