महामार्गावर वाहतूक रोखून ‘अर्थ’पूर्ण चौकशी; पोलिसच साधताहेत ‘समृद्धी’
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2023 02:00 PM2023-08-02T14:00:49+5:302023-08-02T14:02:27+5:30
गाड्या महामार्गावर मधोमध थांबविण्यात आल्या होत्या. त्यामुळे वेगात येणाऱ्या इतर गाड्याही त्या ठिकाणी थांबल्या होत्या.
- शेख मुनीर
छत्रपती संभाजीनगर : वेगवान वाहतुकीच्या मोहाने अनेकांच्या जिवावर उठलेला बाळासाहेब ठाकरे महामार्ग आता वाहतूक पोलिसांच्या ‘समृद्धी’त भर घालतो आहे. सुसाट वाहने महामार्गावर अचानक मध्यभागी थांबवून वाहतूक पोलिस त्यांची ‘अर्थ’पूर्ण चौकशी करीत असल्याने एक नवेच संकट वाहनचालकांवर आल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीत समोर आले.
मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग अनेक कारणांनी चर्चेत आहे. वेगवान वाहनांच्या सतत होणाऱ्या अपघातामुळे समृद्धी महामार्ग प्रत्येकाच्या तोंडोतोंडी झालेला आहे. या संकटातून वाचणारे वाहनचालक आता वाहतूक पोलिसांच्या चौकशीच्या ससेमिऱ्यात अडकत आहेत. महामार्गावर अचानक कुणालाही वाहने थांबविता येत नाहीत; परंतु जटवाडा परिसरात वाहतूक पोलिसांनी समृद्धीवरून जाणाऱ्या अवजड वाहनांना रोखून त्यांची झाडाझडती घेणे सुरू केले आहे. चौकशीचा ‘अर्थ’ ध्यानात घेऊन वाहनचालक वाहतूक पोलिसांना पाहून अगोदरच सावध होत आहेत. ट्रकचालकाशी सौहार्दाची बोलणी झाल्यावरच त्यांना पुढे जाऊ दिले जाते. या भागात एकाच वेळी शिर्डीच्या दिशेने जाणाऱ्या चार अवजड वाहतुकीच्या गाड्या रविवारी भरदुपारी थांबविण्यात आल्या होत्या. या गाड्यांमधील चालकांकडून गाडीच्या कागदपत्रांची तपासणी केली. वाहतूक पोलिसांशी बोलणी करून पुढे निघालेल्या एका ट्रकचालकाशी ‘लोकमत’ प्रतिनिधीने संपर्क साधला असता, त्याने चौकशीचे इंगित सांगितले. विशेष म्हणजे थांबविलेल्या या गाड्या महामार्गावर मधोमध थांबविण्यात आल्या होत्या. त्यामुळे वेगात येणाऱ्या इतर गाड्याही त्या ठिकाणी थांबल्या होत्या. या रस्त्यावर कोठेही थांबण्यास मनाई आहे.
कागदपत्रांत क्षुल्लक त्रुटी आढळल्याने गाडी सोडण्यासाठी प्रत्येकी २०० रुपये द्यावे लागले.
- संबंधित वाहनचालक.
‘समृद्धी’वर वाहने उभी करू नये : आरटीओ
समृद्धी महामार्गावर पार्किंग करता येत नाही. पेट्रोल पंपावर दिलेल्या जागेतच वाहने उभी केली पाहिजेत. रस्त्यावर वाहन उभे केल्यास ‘नो पार्किंग’ची कारवाई केली जाते. तसेच नियमांचे उल्लंघन करून धावणाऱ्या वाहनांचे फोटो काढून कारवाई केली जाते, अशी माहिती आरटीओ कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली. समृद्धी महामार्गावर सातत्याने होणारे अपघात कमी करण्यासाठी आरटीओ कार्यालयाने विविध उपाययोजना सुरूरु केल्या आहेत. यासाठी रात्रंदिवस दोन पथके तैनात करण्यात आली आहेत. या महामार्गावर धोकादायक पद्धतीने वाहनांची पार्किंग करणाऱ्यांवरही आरटीओ कार्यालयाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. गेल्या काही महिन्यांत तब्बल १ हजार ४०१ वाहनचालकांवर ‘नो पार्किंग’ची कारवाई करण्यात आली.