बाईक आडवी लावली, कार फोडली; हवालाचे २७ लाख रुपये घेऊन जाताना व्यापाऱ्यास लुटले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2023 12:15 PM2023-02-21T12:15:15+5:302023-02-21T12:16:12+5:30
करोडी शिवारातील थरारक घटना; या प्रकरणी दाैलताबाद पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे
औरंगाबाद : लासूर स्टेशन येथील कापसाच्या व्यापाऱ्यास हवालाचे २७ लाख ५० हजार रुपये घेऊन जात असताना करोडी शिवारातील टोलनाक्याजवळ धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर लुटल्याची घटना सोमवारी रात्री साडेआठ वाजता घडली. याप्रकरणी दौलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
साईनाथ मनोहर तायडे (रा. लासूर स्टेशन) असे लुटलेल्या कापसाच्या व्यापाऱ्याचे नाव आहे. दौलताबाद पोलिस ठाण्याचे निरीक्षक विनोद सलगरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, साईनाथ तायडे हे औरंगाबाद शहरातून चालक ज्ञानेश्वर भुसारे ( रा. देवळी, ता. गंगापूर) सह लासूर स्टेशनकडे चारचाकी (एमएच २० सीएस ३९१५) वाहनातून रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास जात होते. करोड शिवारातील टोलनाक्याच्या अगोदर असलेल्या उड्डाणपुलावरून लासूर स्टेशनकडे जाण्यासाठी कार वळवली असता समोरून अचानक दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने दुचाकी कारसमोर उभी करून अडवली. तायडे यांना आपल्या वाहनाकडून दुचाकीस्वारांना काही कट बसला की काय, असे वाटले म्हणून त्यांनी दुचाकीस्वारांची माफी मागितली. तोपर्यंत पाठीमागून आलेल्या दुसऱ्या चोरट्याने तायडे यांच्या कारची समोरील काच लाकडी दांड्याने फोडून टाकली. तसेच हातावर दांड्याने मारहाण करीत गाडीत असलेली बॅग काढून द्या, असे धमकावले. घाबरलेल्या तायडे यांनी गाडीतील रोख रक्कम असलेली २७ लाख ५० हजार रुपयांची बॅग चोरट्याच्या हातात दिली. तेव्हा ही बॅग घेऊन चोरटे उड्डाणपुलाच्या खालून पसार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
हवालाचे पैसे असल्याचा दावा
कापसाचे व्यापारी तायडे यांनी शहरातील गोमटेश मार्केट परिसरातून हवालाचे २७ लाख ५० हजार रुपये घेऊन जात असल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती. त्यामुळे हे पैसे कोणाला देण्यासाठी घेऊन जात होते याविषयीची माहिती पोलिस चौकशीत समोर येणार आहे.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची धाव
घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त दीपक गिऱ्हे, वाळूज एमआयडीसीचे निरीक्षक तथा प्रभारी सहायक आयुक्त संदीप गुरमे, दौलताबादचे निरीक्षक विनोद सलगरकर, सहायक निरीक्षक संजय गीते, उपनिरीक्षक सचिन वायाळ, चेतन ओगले यांच्यासह पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.