अल्पवयीन मुलाने ९० हजार पळवले, पोलिसांनी तत्काळ पकडले तरी केवळ दीडहजार हाती लागले
By बापू सोळुंके | Published: March 25, 2023 04:20 PM2023-03-25T16:20:56+5:302023-03-25T16:29:00+5:30
९० हजाराची रोकड चोरताना अल्पवयीन मुलगा सीसीटीव्हीत कैद
छत्रपती संभाजीनगर: जाधवमंडी येथील श्री. साई ट्रेडर्स या दुकानाच्या काऊंटरमधून अल्पवयीन मुलाने ९० हजाराची रोकड लंपास केल्याची घटना २२ मार्च रोजी सायंकाळी ५ ते ५.१५ वाजेदरम्यान घडली. हा प्रकार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. याप्रकरणी दुकानमालक आकाश राजेश बसस्ये यांनी सिटीचौक पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली.
प्राप्त माहितीनुसार नवा मोंढा रस्त्यावरील जाधवमंडी येथे आकाश बसय्ये यांचे दुकान आहे. या दुकानाशेजारी त्यांचे गोडावून आहे. २२ मार्च रोजी सायंकाळी ५ ते ५.१५ वाजेच्या सुमारास ते दुकान उघडे ठेवून शेजारील गोडावूनमध्ये गेले. तेव्हा मोंढा परिसरात नशा करीत फिरणाऱ्या १५ ते १६ वर्षाच्या मुलाने संधी साधून आकाश यांच्या उघड्या दुकानातील गल्ल्यात ठेवलेली ९० हजाराची रोकडे चाेरून नेली.
हा प्रकार समोर आल्यानंतर दुकानदाराने सिटीचौक पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलीस उपनिरीक्षक रोहित गांगुर्डे यांनी दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज पाहिले असता १५ ते १६ वर्षीय मुलगा दुकानाच्या काऊंटरमध्ये हात घालून त्यातील रोख रक्कम चोरून नेत असल्याचे दिसले. यानंतर पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले असता त्याच्याजवळ केवळ दिड हजार रुपये आढळले. उर्वरित रक्कम कुठे ठेवली आणि कोणाकडे दिली याविषयी तो माहिती देत नाही. तो नशेत असल्याने पोलिसही त्याच्यासमोर हतबल झाले. शेवटी त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला.