तिकडे मिशन इलेक्शन, इकडे पाण्यासाठी वणवण; मराठवाड्यातील नागरिकांची तहान टँकरवर

By विकास राऊत | Published: April 18, 2024 03:23 PM2024-04-18T15:23:33+5:302024-04-18T15:24:00+5:30

एप्रिल महिन्याच्या पूर्वार्धातच मराठवाड्याचा ‘टँकर’वाडा होऊ लागला आहे.

A mission election there, a fire here for water; Thirst of the citizens of Marathwada on the tanker | तिकडे मिशन इलेक्शन, इकडे पाण्यासाठी वणवण; मराठवाड्यातील नागरिकांची तहान टँकरवर

तिकडे मिशन इलेक्शन, इकडे पाण्यासाठी वणवण; मराठवाड्यातील नागरिकांची तहान टँकरवर

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आणि तापमानाचा पारा जोरात आहे. राजकारण्यांचे मिशन इलेक्शन सुरू आहे, तर मतदारांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे. विभागातील ३६ तालुक्यांतील ८१३ गावे आणि २६४ वाड्यांतील सुमारे १० लाख मतदारांची तहान सध्या ११९४ टँकरच्या पाण्यावर भागविली जात आहे.

एप्रिल महिन्याच्या पूर्वार्धातच मराठवाड्याचा ‘टँकर’वाडा होऊ लागला आहे. सहा जिल्ह्यांत टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला असून, एप्रिल अखेर आणि मे महिन्यांत टंचाईची काय परिस्थिती असेल, यावर विभागीय प्रशासन आढावा घेत आहे. निवडणुकीचे नियोजन आणि टंचाईच्या उपाययोजनांची प्रक्रिया प्रशासकीय यंत्रणेला सोबतच करावी लागणार आहे.

गावाची लोकसंख्या १ हजारच्या आसपास, तर वाडीवरील लोकसंख्या ५०० असे गृहीत धरल्यास मराठवाड्यातील १० लाख लोकसंख्या सध्या टँकरच्या पाण्यावर अवलंबून असून, येणाऱ्या काळात हे चित्र आणखी भीषण होण्याची शक्यता आहे.

राजधानी तहानली...
मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक ५२७ टँकर सुरू आहेत. जिल्ह्यातील ३४५ गावे आणि ५१ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. राज्यात सर्वाधिक टँकर छत्रपती संभाजीनगर शहरात सुरू आहेत. त्याखालोखाल जालना जिल्ह्यात ३५४ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. २३० गावे आणि ६१ वाड्या टँकरच्या पाण्यावर अवंलबून आहेत. बीड जिल्ह्यात २२६ टँकरने १८५ गावे आणि १४८ वाड्यांना पाणी दिले जात आहे. धाराशिव जिल्ह्यात ७२ टँकरने ४३ गावांना पाणीपुरवठा सुरू आहे. परभणीत २, लातूरमध्ये ८ व नांदेडमध्ये ५ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

किती तालुक्यांत टंचाई
मराठवाड्यातील ७६ पैकी ३६ तालुक्यांतील ग्रामीण भाग सध्या टंचाईच्या विळख्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगरमधील ८ तालुके, जालन्यातील ८, परभणीतील १, नांदेडमधील २, बीडमधील ८, लातूरमधील २, तर धाराशिव जिल्ह्यातील ७ तालुक्यांना टंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत
विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना टंचाईच्या अनुषंगाने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.
- मधुकरराजे अर्दड, विभागीय आयुक्त

Web Title: A mission election there, a fire here for water; Thirst of the citizens of Marathwada on the tanker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.