जन आरोग्य योजनेतील ई-कार्ड काढण्यासाठी महापालिकेची महिनाभर मोहीम
By विकास राऊत | Published: September 16, 2022 12:06 PM2022-09-16T12:06:31+5:302022-09-16T12:06:45+5:30
कार्ड घेतले नाही, त्यांना उपचार घेताना ऐन वेळी धावपळ करावी लागते.
औरंगाबाद : महात्मा जोतीराव फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत शहरातील ३ लाख ९२ हजार लाभार्थ्यांचा समावेश आहे. यातील एक लाख ३५ हजार जणांनीच आजवर ई-गोल्डन कार्ड घेतले आहे. ज्यांनी कार्ड घेतले नाही, त्यांना उपचार घेताना ऐन वेळी धावपळ करावी लागते. त्यामुळे शहरात महापालिकेच्या आरोग्य केंद्रामार्फत ई-कार्डसाठी महिनाभर मोहीम राबविली जाणार असल्याचे प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले. १९ सप्टेंबर ते १९ ऑक्टोबर या कालावधीत ही मोहीम राबविली जाणार आहे, असे त्यांनी नमूद केले.
प्रधानमंत्री आरोग्य योजनेसाठी केंद्र शासनाने शहरातील लाभार्थ्यांची यादी जाहीर केली असून यादी महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. त्यात पीएमजेएवाय-एएमसी-सीबीवर जाऊन आपले नाव प्रत्येकाने शोधावे. त्यात नाव असेल तर महापालिकेच्या संबंधित आरोग्यकेंद्रात जाऊन ई-कार्डासाठी नोंदणी करावी, असे आवाहन डॉ. चौधरी यांनी केले. हे काम आशा स्वयंसेविकांमार्फत केले जाणार असल्याचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ३६, तर शहरातील २६ रुग्णालयांचा समावेश आहे, असे जिल्हा समन्वयक डॉ. मिलिंद जोशी यांनी सांगितले.