भरधाव हायवाने मोपेडला उडवले; एकाचा जागीच मृत्यू
By राम शिनगारे | Published: November 29, 2024 07:34 PM2024-11-29T19:34:15+5:302024-11-29T19:34:20+5:30
रोपळेकर चौकात अपघात ः हायवा चालक पोलिसांच्या ताब्यात
छत्रपती संभाजीनगर: वाळू वाहतुकीच्या भरधाव हायवाने मोपेडला उडवल्याची घटना आज (दि.29) सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास रोपळेकर चौकाजवळ घडली. या अपघातात मोपेडवरील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर जण किरकोळ जखमी झाला आहे. फैजल अब्दूल रहेमान शेख रा. शहागंज असे मृत झालेल्या तरूणाचे नाव आहे. या प्रकरणी हायवा चालक राजेंद्र कचरू पेटारे (32, रा.चिंचोले ता.फुलंब्री ) याला जवाहरनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याप्रकरणी जवाहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फैजल हा नातेवाईकासोबत सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास अमरप्रित चौकाकडून शहानूरमियॉ दर्गाकडे मोपेडवरून जात होता. त्याचवेळी अमरप्रित चौकातून वाळू वाहतुकीचा हायवा (एमएच 20 ईएल 4723) भरधाव वेगाने त्याच दिशेने जात होता. रोपळेकर चौकाजवळ येताच भरधाव हायवाने मोपेडला पाठीमागून जोराची धडक दिली. यात फैजल मागच्या चाकाखाली चिरडला गेला. तर दूसरा बाजूला फेकला गेल्याने बचावला.
दरम्यान, अपघाताचा आवाज ऐकताच रस्त्यावरील नागरिकांनी तात्काळ हायवाला रोखले. त्याचबरोबर जवाहर नगर पोलिसांनीही अपघाताची माहिती दिली. जवाहर पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरिक्षक शेरमळे यांच्यासह पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी गर्दी बाजूला करीत गंभीर जखमीला वाहनाच्या बाहेर काढत घाटीत दाखल केले. येथे तपासून डॉक्टरांनी फैजल अब्दूल रहेमान शेख यास मृत म्हणून घोषित केले.