चार कुटुंबांवर काळोख! डीपीसाठी विद्युतवाहिनी जोडताना ४ मजुरांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2022 07:23 PM2022-07-08T19:23:53+5:302022-07-08T19:25:25+5:30
शेतातून तारा पसरत नेऊन डीपीपर्यंत नेत असताना अचानक विद्युतप्रवाह त्यात उतरल्याने अनर्थ झाला
कन्नड (औरंगाबाद): नविन डीपीला विद्यूत वाहिन्या जोडताना विजेचा धक्का लागून चार मजुरांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज दुपारी हिवरखेडा ( नांदगिर वाडी ) शिवारात घडली. आदिनाथ बाळकृष्ण मगर( २८ ), भारत बाबासाहेब वरकड ( ३२), गणेश नारायण थेटे ( २८ ) व जगदीश छगनराव मुरकुंडे ( ३७, सर्व रा. नावडी ता. कन्नड) अशी मृतांची नावे आहेत.
कन्नड येथील हिवरखेडा ( नांदगीरवाडी ) शिवारात नविन डीपी बसविण्याचे काम सुरु आहे. येथे अर्जुन बाळकृष्ण मगर, भारत बाबासाहेब वरकड, गणेश नारायण थेटे आणि जगदीश छगनराव मुरकुंडे ( ३७) हे तारा ओढण्याच्या मजुरीच्या कामावर होते. दुपारी हे चौघे डीपीला विद्युत पुरवठा करण्यासाठी ११ केव्ही वाहिनी जोडण्याचे काम करीत होते.
ज्या ठिकाणाहुन विद्युत पुरवठा घ्यावयाचा तेथून नविन डीपीचेपर्यंत चौघे मिळून तार पसरवित होते. नविन डीपी कडून गणेश तार ओढीत पुढे गेला. त्यानंतर काही अंतरावर भारत तार ओढण्यास मदत करित होता. त्यानंतर काही अंतरावर अर्जुन ही मदत करित होता तर नविन डीपी जवळच जगदीश तार ओढण्यास मदत करित होता. तारेचे पहिले टोक घेऊन गणेश सहा पोलपर्यंत पोहोचला असतांना त्यात अचानक विद्युत प्रवाह उतरला. तशात जमिन ही ओलसर होती. त्यामुळे जबरदस्त शॉक लागून चौघेही जागीच गतप्राण झाले.
तर पप्पु शब्बीर पठाण ( ३०) हा यात गंभीर जखमी झाला आहे. घटनेची माहिती कळताच नावडी गावावर शोककळा पसरली. उपविभागीय पोलीस अधिकारी मुकुंद आघाव, सपोनि टी आर भालेराव, उपकार्यकारी अभियंता नितीन गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान नावडी येथील नागरीक मोठ्या संख्येने घटनास्थळी धावले.