अजिंठ्याजवळ धावत्या बसने घेतला पेट, दैवबलवत्तर म्हणून २८ प्रवासी सुखरूप
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 03:13 PM2022-03-24T15:13:36+5:302022-03-24T15:14:38+5:30
या भीषण घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या घटनेत बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे.
औरंगाबाद : पुण्यावरून मलकापूरला २८ प्रवासी घेऊन जाणाऱ्या (एमएच १२ ई. क्यू ९० ० ७) एका खासगी बसने अचानक पेट घेल्याची घटना आज पहाटे अजिंठा गावाजवळ घडली. चालकाने प्रसंगावधान राखत वेळीच गाडी थांबवत सर्व प्रवाशांना खाली उतरवल्याने मोठा अनर्थ टळला.
या भीषण घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या घटनेत बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. पुण्यावरून एक खाजगी बस बुधवारी रात्री मलकापूरकडे रवाना झाली. आज पहाटे औरंगाबाद पार केल्यानंतर सिल्लोड-जळगाव महामार्गावरील अजिंठा गावाजवळ बाळापूर फाटा येथे प्रवास्यांनी भरलेल्या या खाजगी बलसा अचानक आग लागली. ही बाब चालक संतोष गईच्या लक्षात आली. संतोष याने प्रसंगावधान राखत बस बाजूला उभी केली. सर्व प्रवास्यांना तत्काळ खाली उतरण्याची सूचना केली. यामुळे बसमधील सर्व २८ प्रवासी वेळीच बाहेर पडले. चालकाने प्रवाशांना सुखरूप खाली उतरविल्याने मोठा अनर्थ टळला
घटनेची माहिती मिळताच अजिंठा पोलीस ठाण्याचे हेड पोलीस कॉन्स्टेबल विक्रम पठाण, पोलीस हेडकॉन्स्टेबल बामणे, कोल्हे आदी पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. मात्र तोपर्यंत बस जळून खाक झाली होती. बसने पेट घेण्यामागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.