corona virus: आरोग्य यंत्रणेपुढे नवी चिंता; कोरोना उतरलाय आता गळ्याखाली
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2022 11:52 AM2022-09-05T11:52:32+5:302022-09-05T11:54:12+5:30
‘पाॅझिटिव्ह’पेक्षा निगेटिव्ह, पण कोविड, स्वाइन फ्लूसदृश्य रुग्णांचीच संख्या सर्वाधिक
- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : कोरोना आणि स्वाइन फ्लू पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी असल्याने आरोग्य यंत्रणेला दिलासा मिळत असेल, असा अनेकांचा समज होईल. पण टेस्टमध्ये कोरोना आणि स्वाइन फ्लू सापडतच नाही आणि रुग्णाला गंभीर लक्षणे दिसतात, अशा नव्या चिंतेला सामोरे जावे लागत आहे. कोरोना आता गळ्याखाली उतरला आहे. त्यामुळेच चाचण्या निगेटिव्ह येत असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. पाॅझिटिव्ह रुग्णांपेक्षा कोविड, स्वाइन फ्लूसदृश्य रुग्णांचीच संख्या सध्या सर्वाधिक आहे. त्यामुळे टेस्ट निगेटिव्ह आली म्हणून ‘आता काही टेन्शन नाही...’ असे म्हणणे कदाचित धोकादायक ठरू शकते.
जिल्ह्यात जूनपासून कोरोनाने पुन्हा डोके वर काढले. मात्र, अवघ्या दोन महिन्यांत रुग्णसंख्येचा आलेख घसरला. त्यामुळे आरोग्य यंत्रणेकडून दिलासा व्यक्त होत नाही तोच स्वाइन फ्लूने डोके वर काढले. जिल्ह्यात आतापर्यंत ३७ स्वाइन फ्लूच्या रुग्णांचे निदान झाले. कोरोना, स्वाइन फ्लू दोन्ही आजारांच्या रुग्णांचे निदान होत आहे. रुग्णांची संख्या कमी आहे. परंतु या दोन्ही आजारांची लक्षणे आहेत. प्रकृती गंभीर होऊन रुग्णालयात भरती होण्याची वेळ येत असूनही रुग्णांचा अहवाल नकारात्मक येत असल्याचा प्रकार आरोग्य यंत्रणेसाठी चिंतादायक ठरत आहे.
किती आहेत कोविड, स्वाइन फ्लूसदृश्य रुग्ण?
घाटी रुग्णालयात ऑगस्ट महिन्यात तब्बल १२२ कोविड, स्वाइन फ्लू रुग्णांवर उपचार करण्यता आले. रुग्णांच्या तपासणीचा अहवाल निगेटिव्ह असूनही भरती होण्याची वेळ रुग्णांवर ओढवली. खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या यापेक्षा अधिक आहे.
सर्दी, खोकल्याचा कालावधी लांबला
सर्दी, खोकला साधारणपणे ३ ते ५ दिवसांत बरा होताे. परंतु सध्या ८ ते १५ दिवस या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
शहरातील कोरोनाची स्थिती
तारीख-कोरोना टेस्ट- पाॅझिटिव्ह रुग्ण
३१ ऑगस्ट-१६७-२
१ सप्टेंबर-१५१-३
२ सप्टेंबर-२०७-४
३ सप्टेंबर-९८-५
काळजी घेणे गरजेचे
स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या कमी आहे. तरी सामान्य सर्दी, खोकला, तापाच्या रुग्णांची संख्या अधिक आहे. स्वाइन फ्लू न्यूमोनिया, कोविड न्यूमोनिया आणि कम्युनिटी ॲक्वाएर्ड न्यूमोनिया असे वेगवेगळ्या प्रकारचे रुग्ण दाखल होत आहेत. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी काळजी घ्यावी.
- डाॅ. मीनाक्षी भट्टाचार्य, मेडिसिन विभागप्रमुख, घाटी