गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा; छत्रपती संभाजीनगरात दर ९ दिवसांनी उघडते एक नवे खासगी रुग्णालय!
By संतोष हिरेमठ | Published: April 7, 2023 03:28 PM2023-04-07T15:28:41+5:302023-04-07T15:29:53+5:30
५ वर्षांत १७० नवीन रुग्णालये सुरू; मुंबई, पुण्याचे रुग्ण आता उपचारासाठी शहरात
छत्रपती संभाजीनगर : बायपास अथवा अन्य शस्त्रक्रिया करायची म्हटले की, काही वर्षांपूर्वी मुंबई वा पुणेच गाठावे लागे. मात्र, आता शहर आरोग्यासाठी इतके ‘फिट’ झाले आहे की, मुंबई, पुण्याचे रुग्णच शहरात येतात. इतकेच काय, परदेशी रुग्णही येत असल्याने शहरात मेडिकल टुरिझमही वाढत आहे. शहरात साधारणपणे दर ९ दिवसांनी एक नवे खासगी रुग्णालय उघडत आहे.
दरवर्षी ७ एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन साजरा होतो. यावर्षी या दिनाची ‘सर्वांसाठी आरोग्य’ ही संकल्पना आहे. शहरात मराठवाड्यातील रुग्णांचा आधारवड ठरणारे घाटी रुग्णालय, शासकीय कर्करोग रुग्णालय, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, महापालिकेची आरोग्य केंद्रे आणि रुग्णालये, जिल्हा सामान्य रुग्णालय, राज्य कामगार विमा योजना रुग्णालयांबरोबर खासगी रुग्णालयांचे जाळे आहे. ५ वर्षांत १७० नवीन खासगी रुग्णालयांची भर पडली.
शहरात किती स्वस्त उपचार?
जाॅइंट रिप्लेसमेंटच्या शस्त्रक्रियेसाठी मुंबई, पुण्यात किमान ३ लाख ते ३.५० लाख रुपये लागतात. ही शस्त्रक्रिया शहरात एका लाखात होते. इतर उपचारही मुंबई, पुण्याच्या तुलनेत ५० टक्के दरात होतात. त्यामुळे मुंबई, पुण्याचे रुग्णही शहरात येतात.
- २०१८ पर्यंत शहरात खासगी रुग्णालये- ३६६
- २०२३ मध्ये आता खासगी रुग्णालये- ५३६
- पाच वर्षांत वाढलेली नवीन खासगी रुग्णालये- १७०
- शहरातील डाॅक्टरांची संख्या-२५००
अशी वाढली शहरातील खासगी रुग्णालये
वर्ष- खासगी रुग्णालये
२०१८ ते १९ - ५२
२०१९ ते २० - ३१
२०२० ते २१ - २२
२०२१ ते २२ - ४१
२०२२ ते २३ - २४
दरवर्षी १० नव्या डाॅक्टरांची भर
मुंबई, पुण्याच्या तुलनेत शहरात अत्यल्प दरात उपचार होतात. शहराला दरवर्षी किमान १० नवीन डाॅक्टर मिळतात. जवळपास ८५ टक्के रुग्ण खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेतात. १५ टक्के रुग्ण शासकीय रुग्णालयात जातात. शासकीय रुग्णालयांचे स्टँडर्ड वाढावे, त्यासाठी आरोग्याचे बजेट वाढविण्याची गरज आहे.
- डाॅ. यशवंत गाडे, अध्यक्ष, ‘आयएमए’
नागरिकांचा आरोग्यावरील खर्च वाचणार
महापालिका आगामी वर्षात आरोग्यासाठी भरीव कामगिरी करेल. सोनोग्राफी, डायलिसिससह इतर सोयीसुविधांमध्ये वाढ होईल. नागरिकांचा खर्च वाचेल, त्यांना अधिकाधिक उपचार मोफत मिळतील, यासाठी प्रयत्नशील आहोत.
- डाॅ. पारस मंडलेचा, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, मनपा