कारागृहातून कुख्यात गुंड चालवतो अमली पदार्थांचे सिंडिकेट; आई, बहिणी अन् मेहुण्याची मदत

By राम शिनगारे | Published: July 31, 2024 08:17 PM2024-07-31T20:17:06+5:302024-07-31T20:18:01+5:30

‘एनडीपीएस’ पथकाच्या कारवाईत पर्दाफाश

A notorious gangster runs a drug syndicate from prison; Help of mother, sister and brother-in-law | कारागृहातून कुख्यात गुंड चालवतो अमली पदार्थांचे सिंडिकेट; आई, बहिणी अन् मेहुण्याची मदत

कारागृहातून कुख्यात गुंड चालवतो अमली पदार्थांचे सिंडिकेट; आई, बहिणी अन् मेहुण्याची मदत

छत्रपती संभाजीनगर : एमपीडीए कायद्यांतर्गत हर्सूल कारागृहातून कुख्यात गुंड सय्यद फैसल ऊर्फ तेजा आई, बहीण आणि मेहुण्याच्या मदतीने अमली पदार्थांच्या विक्रीचे सिंडिकेट चालवत असल्याची धक्कादायक माहिती आहे. नव्यानेच स्थापन झालेल्या एनडीपीएस पथकाने छापा मारत हा प्रकार उघडकीस आणला. त्याशिवाय तेजाच्या आईकडून महागड्या औषधांच्या ४१ बाटल्या जप्त केल्या आहेत. याप्रकरणी बेगमपुरा पोलिसांनी एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा नोंदविला आहे.

आरोपींमध्ये रेश्मा अंजुम सय्यद एजाज (४५, रा. किलेअर्क), तिचा मुलगा सय्यद फैसल ऊर्फ तेजा, जावई आदनान शेख बब्बू शेख ऊर्फ सोनू मनसे, मुलगी नबीला अंजुम सय्यद एजाज आणि एजंट मोबीन कुरेशी ऊर्फ मोबीन कचरा (रा. पैठण गेटजवळ) समावेश आहे. पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी स्थापन केलेल्या एनडीपीएस पथकाच्या प्रमुख वरिष्ठ निरीक्षक गीता बागवडे यांच्या पथकास अमली पदार्थांची किलेअर्क परिसरात विक्री होत असल्याचे समजले. बागवडे, उपनिरीक्षक संदीप शिंदे, अंमलदार महेश उगले, सतीश जाधव, संदीप धर्मे, विजय त्रिभुवन, छाया लांडगे आणि औषधी निरीक्षक अंजली मिटकर यांनी छापा मारला.

रेश्मा पळून जाण्याचा प्रयत्न करीत असतानाच तिला महिला अंमलदाराने पाठलाग करून पकडले. तिच्या घराची झडती घेतल्यानंतर अवैध विक्रीसाठी ठेवलेल्या ४१ बाटल्या सापडल्या. पोलिसांना तिने सांगितले की, नशेसाठी गोळ्या, औषधी विक्रीचा व्यवसाय कारागृहात असलेला मुलगा चालवतो. त्याचे अनेक एजंट असून, कारागृहात भेटायला गेल्यानंतर त्याने हे सर्व समजून सांगितले. त्यानंतर एजंट मोबीन कचरा हा औषधीचा पुरवठा करतो. जावई सोनू औषधी घरी आणतो आणि मुलगी नबीला व रेश्मा औषधीची विक्री करतात, अशी कबुली आरोपींनी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

१५० ची औषधी ५०० रुपयांना
रेश्मा एजंटामार्फत १७५ रुपये किंमत असलेली औषधी १५० रुपयांमध्ये खरेदी करीत होती. तीच औषधी ५०० रुपयांना विकत होती. दररोज १०० पेक्षा अधिक बाटल्यांची विक्री होत असे. मात्र, आरोपी औषधीच्या साठ्याची माहिती देत नाहीत.

तेजावर १२ गुन्हे
अमली पदार्थांची हर्सूल कारागृहातून विक्री करणारा सय्यद फैसल ऊर्फ तेजा हा कुख्यात गुंड आहे. एमपीडीए कायद्यांतर्गत त्याच्यावर कारवाई केली आहे. त्याच्या विराेधात वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात १२ वर गुन्ह्यांची नोंद आहे. एजंट मोबीन कचरा हाही रेकॉर्डवरील आरोपी आहे.

 

Web Title: A notorious gangster runs a drug syndicate from prison; Help of mother, sister and brother-in-law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.